खासदार हेमंत पाटील, यांची अतिरिक्त कृषी सचिव डॉ.पी.के.मेहेरडा यांच्याकडे मागणी
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली जिल्ह्यातील ५ लाख शेतकऱ्यांनी तुर, कापूस, सोयाबीन व हरभरा पिकांची पेरणी करून "पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत विमा काढला आहे. अतिवृष्टी, अवर्षण, बोगस बियाणे (विरळ उगवणे), गोगलगाय रोगांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या पिकांचे एचडीएफसी, ईआरजीओ इन्शुरन्स कंपनीने दाखल केलेली राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील पीक विमा अपील फेटाळून लावली आहे.
आस्मानी संकट आणि पीक विमा कंपनीच्या चुकीच्या धोरणामूळे शेतकरी दोन्ही बाजूने अडचनीत सापडला आहे. शेतकऱ्यांना नुकसानीप्रमाणे भरपाई देण्याची भूमिका घेणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि येत्या १५ जानेवारी 2024 रोजी होत असलेल्या जिल्हा पीक विमा कंपनीच्या बैठकीमध्ये हिंगोली जिल्हयातील शेतक-यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी खासदार हेमंत पाटील यांनी अतिरिक्त कृषी सचिव डॉ.पी.के.मेहेरडा यांच्याकडे मागणी केली आहे.
खासदार हेमंत पाटील यांनी शुक्रवार दि.१२ रोजी दिल्ली येथील कृषी भवन येथे अतिरिक्त कृषी सचिव डॉ.पी.के.मेहेरडा यांची भेट घेतली व वरील मागणी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतक-यांनी साधारणत: सोयाबीन पीकासाठी ३ लाख २१ हजार, कापसासाठी ६५ हजार आणि तूरसाठी ७५ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभरा पिके घेणाऱ्या ५ लाख शेतकऱ्यांना पीकविमा अद्याप मिळाला नाही.
15 जानेवारी 2024 रोजी होणा-या बैठकीत वरील कंपनीचे अधिकारी यांना बोलावून पीक विम्यापासून अद्याप वंचित असणाऱ्या हिंगोली जिल्हयातील शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा द्यावा व कंपन्यांवर कडक कारवाई करावी. अशी देखील खासदार हेमंत पाटील यांनी अतिरिक्त कृषी सचिव डॉ.पी.के.मेहेरडा यांच्याकडे मागणी आहे.
केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले आहेत. सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मात्र काही कंपन्या हया शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेताना दिसून येत आहेत. शेतकऱ्यांविरोधात भूमिका घेणाऱ्या पीक विमा कंपन्यांवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी देखील खासदार हेमंत पाटील यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा