मजूरावर उपचार सुरू, परिसरात दहशतीचे वातावरण
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
शेतात कामासाठी जात असलेल्या एका शेत मजूरावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बिरसिंगपूर शिवारात घडली. जखमी शेत मजूरावर सध्या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
राजू बाबुराव सोनुने (३०, रा. बिरसिंगपूर) असे जखमी झालेल्या शेत मजुराचे नाव आहे. बुलढाणा-देऊळघाट मार्गालालागून दलाल यांचे शेत आहे. या परिसरात असलेल्या एका झुडपात बिबट्या होता. राजू सोनुने हे शेतात कामासाठी जात असताना बिबट्याने झुडपातून बाहेर येत त्यांच्यावर अचानक झडप घालत त्यांना जखमी केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे राजू सोनुने यांनी आरडा अेारड केली. त्यामुळे परिसरात असलेल्या शेतात काम करणाऱ्या लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान झालेल्या गोंधळ व आवाजाने बिबट्याने तेथून पळ काढला. सध्या सोनुने यांच्यावर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. बिबट्याने हल्ला केल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचत जखमीची विचारपूस करत घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. सोबतच आरएफअेा अभिजित ठाकरे यांनी पथकासह घटनास्थळ गाठत पंचनामा केला. दुसरीकडे या परिसरात बिबट्ट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा