हिंगोलीत आज होणार खेळाडुंची निवड चाचणी
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली (प्रतिनिधी)- हनुमान नगर येथील एसआरपीएफ कॅम्प समोरील स्मार्ट फेंसिंग स्पोर्ट्स क्लब येथे तलवार बाजी स्पर्धेत सहभागी खेळाडूंची रविवार दि.३१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता निवड चाचणी घेण्यात येणार असल्याचे संघटनेचे सचिव संजय भुमरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी प्रमाणे जिल्हा फेन्सिंग असोसिएशन यांच्या वतीने तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन शालेय स्तरावर विविध वयोगटात आयोजित केले जाते. त्यानुसार ही स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथील साई क्रीडा प्राधिकरण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, या ठिकाणी दि.५ ते ७ जानेवारी या दरम्यान ३१ वी महाराष्ट्र राज्य पुरुष व महिला फेन्सिंग स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेमध्ये हिंगोली जिल्ह्याचा पुरुष व महिला संघ यामध्ये सहभागी होणार आहे. या स्पर्धेत खेळाडू सहभागी होण्यासाठी खेळाडूची जन्मतारीख १ जानेवारी २०११ पूर्वीची असावी. ही स्पर्धा व निवड चाचणी रविवारी ३१ डिसेंबर रोजी स्मार्ट फेन्सिंग स्पोर्ट्स क्लब एसआरपीएफ कॅम्प या ठिकाणी होणार असून खेळाडूंनी सकाळी १० वाजता खेळाच्या गणवेशांमध्ये पांढरा पोशाख उपस्थित राहण्याचे आवाहन निवड समितीने केले आहे. या निवड समितीत सदस्य म्हणून संदीप वाघ, प्रा.नरेंद्र रायलवार, प्रभाकर काळबांडे यांचा समावेश आहे. हिंगोली जिल्हा फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण देशमुख, उपाध्यक्ष आनंद भट्ट, कोषाध्यक्ष विजय जऊळकर, संघटनेचे सचिव संजय भुमरे यांनी खेळाडूंना निवड चाचणी स्पर्धेसाठी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा