साखर कारखान्याचे वजनकाटे डिजीटल करावे आणि २५ किलोमीटरची अट काढावी
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (शहर प्रतिनिधी जगदीश कोरीमठ)
मागील वर्षी साखर कारखान्यांनी साखर आणि इथेनॉल विक्रीतून अधिकचे पैसेमिळवले आहेत, साखरेचे उत्पादन कमी करून इथेनॉल उत्पादन करण्यात आले आहे. प्रत्येक कारखान्याने तीन ते चार टक्के रिकवरी हे इथेनॉल निर्मितीसाठी वापरली आहे. हे सर्व पैसे कारखान्याकडे आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी एक रक्कमी एफआरपी सह चारशे रुपये फरक ऊस उत्पादकांना देण्यात यावेत.आणि हे सहज शक्य आहे, कारखान्याची बॅलन्स शीट पहिली तर आपल्याला हे लक्षात येईल.अशी मागणी भाजप किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या कडे केली आहे.
सन २०२२-२३ च्या हंगामामध्ये प्रॉफिट एरियर्स गुणसूत्रानुसार आणखी ४०० रुपये प्रति टन इतका फरक शेतकऱ्यांना देण्यात यावा, यासाठी साखर आयुक्तालयामार्फत साखर कारखानदार व शेतकरी प्रतिनिधींची बैठक लावण्यात यावी.
शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी प्राप्त व्हावी.
जिल्हास्तरावर साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांचे समन्वय बैठकीमध्ये भाजप किसान मोर्चाचे प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात यावे, यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुचित करण्यात यावे. शेतकऱ्यांनी बाहेरील वजन काट्यावर वजन करून आणल्यास सदरचा ऊस तातडीने वजन न करता, विनाअट स्वीकारण्यात यावा.साखर कारखान्यांवरील वजन काट्यांची वेळोवेळी तपासणी व्हावी व ऊसाचे वजन तात्काळ ऑनलाइन उपलब्ध व्हावे. सर्व वजनकाटे डिजीटल करण्यात यावेत.
ऊसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांसाठी २५ किलोमीटरची अट काढून टाकण्यात यावी.
साखर कारखान्याकडून अदा होणाऱ्या बिलातून थेट कर्ज वसुली करण्यात येऊ नये.
साखर कारखानदारांना मुकादम किंवा ऊस वाहतूकदार यांचेकरिता परस्पर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढवून कर्ज देण्यात येऊ नये, असे कर्ज दिले असल्यास असा बोजा लवकरात लवकर काढण्यासंदर्भात सहकार आयुक्त यांना सुचित करण्यात यावे.
तरी वरील मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन भाजप किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांच्या उपाययोजनांसाठी चर्चा करून तात्काळ मार्ग काढण्याचे अश्वासन देण्यात आले.
यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब सातव, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवर,मनोज कासवा, जयेश शिंदे, भगवानराव काटे, प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्रांती भुसनर, नितीन गडदरे, ऍग्रिकोसचे प्रदेश संयोजक राहुल भोसले, पुणे जिल्हाध्यक्ष तानाजी थोरात, सचिन मचाले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा