हडपसरमध्ये मराठा आंदोलनकर्त्यांवरील हल्ल्याचा जाहीर निषेध
शिवशाही वृत्तसेवा, पुणे (जिल्हा प्रतिनिधी अभिषेक जाधव)
पुणे दि ७:- जालन्यातील आंदोलनाचे लोण आता राज्यातील गावागावात पोहोचले आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आदेश देत नाहीत, तोपर्यंत पोलीस लाठीचार्च करू शकत नाहीत. शातंतामय मार्गाने मराठा आंदोलनकर्त्यावर लाठीचार्च आणि गोळीबार केल्यामुळे राज्यभरातील मराठा तरुण पेटून उठला आहे. शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण हवे आहे, गरीब मराठा समाजाला ते मिळालेच पाहिजे, अशी भूमिका माजी आमदार महादेव बाबर यांनी मांडली.
हडपसर मराठा सकल समाजाच्या वतीने हडपसर गांधी चौक ते गाडीतळ रॅली काढण्यात आली. हडपसर गाडीतळ येथे माजी आमदार महादेव बाबर आणि महिलांनी हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे आणि शिवले यांना निवेदन दिले. याप्रसंगी माजी नगरसेवक योगेश ससाणे, महेंद्र बनकर, मराठा मोर्चाचे महेश टेळे, संदीप लहाने, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष दिलीप शंकर तुपे, माजी अध्यक्षा मंदा नलावडे, राष्ट्रवादी हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, महिला अध्यक्षा वैष्णवी सातव, कार्याध्यक्षा सविता मोरे, दिलीप गायकवाड, निलेश काळे, सागरराजे भोसले, हनुमंत मोटे, सचिन मोरे, दिपाली कवडे, संजय शिंदे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल हरपळे यांच्यासह युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार महादेव बाबर म्हणाले की, मराठा तरुणांना नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलेच पाहिजे, राज्यकर्ते मराठा आरक्षणाकडे गांभीर्याने पाहात नाही, शांततेने सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्यामुळेच आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत.
आमदार चेतन तुपे म्हणाले की, जालन्यातील मराठा आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करून लाठीचार्ज आणि गोळीबार ही बाब अत्यंत निंदणीय आहे. राज्यकर्ते मराठा समाजाविषयी कायम दुटप्पी भूमिका घेत आहे, असा आरोप त्यांनी केला.
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, त्यासाठी आम्ही न्याय मार्गाने लढा देऊन ते मिळविल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, महागाई आणि बेरोजगारीवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज, गोळीबार केला. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाचा विकास होऊ द्यायचा नाही, मांडलिक झालेला पाहायचा आहे, त्यामुळे आंदोलनकर्त्यांवरील हल्ला केला असा थेट आरोप त्यांनी केला.
माजी उपमहापौर नीलेश मगर म्हणाले की, गृहमंत्र्यांनीच लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला, त्यामुळे हजारो मराठा बांधव जखमी झाले आहेत. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.
अनिल मोरे यांनी सूत्रसंचालन केले. विशाल लहाने यांनी आभार मानले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा