गडगेकरांना होत आहे नाहक त्रास - अधिकाऱ्यांनीही फिरवली पाठ
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड ( शिवाजी कुंटूरकर )
नायगाव तालुक्यातील गडगा गाव अन् गावच्या पाणीपुरवठ्याची समस्या हे तर जणू काही समीकरणच बनले आहे. केवळ पंप ऑपरेटरचा पगार थकविल्याने तब्बल दोन वर्षापासून सार्वजनिक नळयोजना बंद आहे. गंभीर पाणी प्रश्न ग्रामपंचायत व्यवस्थापन दरबारात बेदखल झाला आहे. संबधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील समस्येकडे पाठ फिरवल्याने लाखों रूपयांचा निधी मिळालेल्या गावात पाण्यासाठी गावकऱ्यांचा वणवास सुरू आहे. ही नळयोजना बंद ठेवून नवीन नळयोजना मंजूरीचा खटाटोप निधीचा मलीदा लाटण्यासाठी होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
९३८ उंबरवठे अन् पाच हजार लोकसंख्या असलेल्या गडगा गावच्या पाणीपुरवठा योजनांवर कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला परंतु नळयोजना मात्र बंद आहे. पाणीपुरवठा योजनावर गावाला भारत निर्माण योजनेंतर्गत सन २००३ मध्ये ७५ लक्ष रुपये, राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ कोटी ४० लक्ष रूपये निधी मिळाला. तो योजनेच्या कामावर खर्च करण्यात आला पण गावात अंतर्गत जलवाहिनी चूकीच्या पध्दतीने टाकण्यात आली. वाॅल्व्हची कामे तर करण्यात आलीच नाहीत.
टेंभुर्णी ते गडगा अशी जलवाहिनी टाकण्यात आली. मन्याड नदीच्या काठावर टेंभुर्णी येथे पाणीपुरवठ्याची स्वतंत्र विहीर खोदून बांधण्यात आली. पाणीपुरवठ्यासाठी दोन उच्चदाबाच्या मोटारी (पंप) उपलब्ध आहेत. आजघडीला विहीर पाण्याने तुडुंब भरलेली आहे. हे सगळं काही बरोबर आहे. पण त्याठिकाणाहून पाणीपुरवठ्याचे व्यवस्थापन बघणाऱ्या पंप ऑपरेटरचे वेतन गडगा ग्रामपंचायतीने दिले नसल्याने, पंप ऑपरेटरनी काम करणे बंद केले आहे. तेव्हांपासून म्हणजे सन २०२१ पासून गावचा पाणीपुरवठा बंद आहे. पंप ऑपरेटर व ग्रा.पं. व्यवस्थापन यांच्यात सुरू असलेल्या वादात गडगेकरांना त्रास सहन करावा लागत आहे.
----------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा