शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (शिवाजी कुंटूरकर)
बिलोली तालुक्यातील गळेगावचे स्वस्त धान्य दुकानदार दत्तात्रय मारुती निमलवाड हा सरकारी धान्य लाभार्थ्यांना न देता काळ्या बाजारात विकायला नेत असताना गावकऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. त्यानंतर त्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. गळेगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील दुकानदार दत्तात्रय निमलवाड, हा गेले काही दिवसांपासून सरकारी धान्य काळ्या बाजारात विकत असल्याचा गावकऱ्यांना संशय होता. त्यामुळे गावातील जागरूक नागरिक गुंडेराव नाईक आणि भुजंगराव पाटील यांनी इतर गावकऱ्यांच्या मदतीने त्याच्यावर पाळत ठेवली होती.
दिनांक 27 रोजी रेशन दुकानदार धान्य घेऊन देगलूर कडे जाणार असल्याची माहिती मिळाल्याने, वरील गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून देगलूर जवळच्या वनाळी टोल नाक्याजवळ त्याला रंगेहात पकडला. टेम्पो क्रमांक HH-12 SX-1362 या गाडीत दहा पोते तांदूळ आणि 50 किलोचे १३ कट्टे गहू असा माल काळ्या बाजारात विकायला नेत असल्याचे निदर्शनास आल्यावर, गावकऱ्यांनी त्याला देगलूर पोलिसांच्या हवाली केला.
या रेशन दुकानदाराबाबत गावकऱ्यांनी यापूर्वीसुद्धा अनेकदा तक्रारी केल्या होत्या, पण संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे त्याची हिंमत वाढत गेली. मात्र आता मालासहित रंगीहात पकडल्यामुळे तरी अधिकाऱ्यांनी दत्तात्रय निमलवाडी या स्वस्त धान्य दुकानदाराची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी असे निवेदन गावकऱ्यांनी दिले आहे. गुंडेराव नाईक आणि भुजंगराव पाटील यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी, बिलोलीचे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व देगलूरच्या तहसीलदार इत्यादी सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या दुकानदारावर कारवाई नाही झाली तर भविष्यात आमरण उपोषण आंदोलन केले जाईल.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा