शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (शिवाजी कुंटूरकर )
नायगाव : सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत मद्य विक्री करण्याची परवानगी असताना नायगावसह तालुक्यातील कुष्णूर व ग्रामीण भागातील अनेक बार रात्री उशिरा पर्यंत चालू राहत आहेत. नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत मद्य विक्री करणाऱ्या बार चालकांना उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीच पाठबळ देत असल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे.
नायगाव तालुक्यातील अनेक गावात अवैध देशी व विदेशी दारुची राजरोसपणे विक्री होत असताना उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना, या अवैध विक्रीला आजपर्यंत पायबंद घालण्यात अपयश आले आहे. याबाबत जास्तच तक्रारी झाल्यास थातूरमातूर कारवाई करुन मोकळे होतात व धाडशी कारवाई केल्याच्या अविर्भावात आपली पाट थोपटून घेतात आजपर्यंत असाच प्रकार चालू आहे. जागरूक नागरिकांना व सामाजिक कार्यकर्त्यांची गैरसोय होण्यासाठी नायगाव तालुक्याचे अ व ब असे दोन भाग करुन गोंधळ निर्माण करुन ठेवला आहे. कारण उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे कुठलेही पितळ उघडे पडू नये यासाठी जेवढी गैरसोय करुन ठेवता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत.
अनेकदा कार्यालयाला असते कुलूप
दोन तीन तालुक्याचे कार्यालय बिलोलीलाच असले तरी या कार्यालयाचा कारभार नांदेड येथूनच चालतो. केवळ महिण्याचे पाच दिवसच हे कार्यालय उघडे राहते. ते ही वसूलीसाठी. मात्र काही दिवसांपूर्वी अनेक वर्तमानपत्रात उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचा पंचनामा झाल्याने सध्या कार्यालय उघड आहे. तालुक्यातील बियर बारमधून अनेक गैरप्रकार घडत असतांना कुठलीही कारवाई करण्याचे धाडस या विभागाचे भ्रष्ट अधिकारी दाखवत नाहीत. दर महिण्याला वसूली करायची आणि बार चालकांना मोकळे रान सोडून द्यायचे असाच शिरस्ता चालू आहे.
नायगाव तालुका ८० गावांचा असून कहाळ्यापासून सुरु होणाऱ्या तालुका हद्दीत मोठ्या प्रमाणात बियर बार आहेत. यातील असंख्य बारमधून बऱ्याच अनुचित घडामोडी घडतात पण उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी फक्त चिरीमिरी घेवून प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न करतात. उत्पादन शुल्क विभागातील खाबुगिरीमुळे शासनाचे बरेच अर्थिक नुकसान होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे. पण सोकावलेल्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांना कशाचेच सोयरसुतक नाही हे विशेष. नायगाव तालुक्याचे विभाजन केल्याने कोणता भाग कुणाकडे आहे याची माहिती सुध्दा गोपनीय ठेवण्यात आली असल्याने तालुक्यातील बार चालक मनमानी करत आहेत. सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी असताना अनेक बार सकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान सुरु होतात आणि रात्री १२ ते १ वाजेपर्यंत चालू राहतात.
नायगाव तालुक्यातील अनेक तक्रारी उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक यांच्यापर्यंत जातात पण ते यावर काहीही कारवाई करत नाहीत त्यांच्याशी.संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास होत नाही. एकही अधिकारी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षकांचा नंबर देण्याची हिम्मत करत नाही. कुणाला संपर्क नंबर दिल्यास खबरदार अशी तंबीच त्यांनी दिली असल्याचे सांगण्यात येते.
भरारी पथक फक्त नावालाच
अवैध दारु विक्री बरोबरच धाब्यावर होणाऱ्या मद्यप्राशनावर पायबंद घालण्याची जबाबदारी असताना हे भरारी पथकही वसूली करत असल्याने आजही राजरोसपणे धाब्यावर मद्याचे घोट रिचवल्या जात आहेत.
अधिकारी फक्त वसुलीत मग्न
उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय बिलोलीला असले तरी या विभागाचे अधिकारी कधीच कार्यालयात भेटत नाहीत पण दर महिन्याच्या १ व २ तारखेला मात्र वसुलीसाठी तळ ठोकून असतात. वसूली केलेल्या रक्कमेचा हिस्सा खालपासून वरपर्यंत जात असल्याने आळीमिळी गुपचिळी असाच प्रकार चालू आहे.
उत्पादन शुल्क निरिक्षक नॉट रिचेबल
नायगाव तालुक्यातील काही बार सकाळी लवकर व रात्री उशिरा पर्यंत चालू असल्याबातची आणि काही ठिकाणी गैरकारभार होत असल्याची माहिती घेण्यासाठी फोन केला होता पण बिलोलीचे उत्पादन शुल्क निरिक्षक एस.बी. बोधमवाड यांनी प्रतिसाद दिला नाही.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा