' मजा मा ' म्हणत धकधक गर्ल माधुरी दीक्षित पुन्हा येतेय
अभिनय, नृत्य आणि सौंदर्याची खाण माधुरी दीक्षित आपल्या एका नव्या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. ९० च्या दशकात भारतीय चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारी माधुरी दीक्षित बराच काळ चित्रपटात दिसली नव्हती . डॉ. नेनेसोबत लग्न करून संसारात रमलेली माधुरी मध्यंतरी आजा नच ले मधून पुन्हा चित्रपटात दिसली होती. तसेच काही रियालिटी शो, वेबसिरीज , तिने केल्या आहेत. बकेट लिस्ट सारखा मराठी सिनेमादेखील तिने केला. परंतु हिंदी चित्रपटापासून ती बराच काळ दूर होती.
मात्र प्रेक्षकांची लाडकी धक धक गर्ल माधुरी दीक्षित पुन्हा चित्रपटांमध्ये झळकणार आहे. माधुरीची मुख्य भूमिका असलेला ' मजा मा ' हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक कौटुंबिक मनोरंजन चित्रपट आहे. पारंपारिक सणांचे सादरीकरण व अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा रंगीबेरंगी भारतीय लग्न सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर घडणारी कथा यात आहे. प्रसन्न व मजेशीर असे विचारांना प्रवृत्त करणारे नाट्य असून , यात अनेक अनपेक्षित धक्के व वळणे आहेत.
या चित्रपटात माधुरी आजपर्यंत कधीही न दिसलेल्या भूमिकेत दिसणार आहे. यात गजराज राव, ऋत्विक भौमिक, बरखा सिंह, सृष्टी श्रीवास्तव, रंजीत कपूर, शिबा चड्डा, सिमोन सिंह, मल्हार ठाकर व निनाद कामत आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. आहेत. सुमित बथेजा लिखित या चित्रपटाचे आनंद तिवारी यांनी दिग्दर्शन केले आहे. पुढच्या महिन्यात ६ ऑक्टोबरला प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा