तुकाराम खंडागळे यांनी केली होती संचालक पद रद्द करण्याची मागणी
शिवशाही वृत्तसेवा सोलापूर
गावात रहिवासी नसल्याची तक्रार निकालात काढल्याने जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी यांचे पद अबाधित राहिले आहे. जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास कार्यालयाचे सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे यांनी हा निर्णय सोमवारी दिला. दूध उत्पादक संघाच्या सार्वजनिक निवडणुकीत दीपक माळी हे मोहोळ तालुक्यातील पीर टाकळी येथील विक्रांत - विजय या दूध संस्थेतून संचालक म्हणून निवडून आले आहेत.
मात्र ते कामती येथील रहिवासी असून त्यांचा पीर टाकळी येथील विक्रांत - विजय दूध संबंध नसल्याने त्यांचे संचालक पद रद्द करण्याची मागणी तुकाराम खंडागळे यांनी केली होती. त्यावर सहाय्यक निबंधक आप्पासाहेब गावडे यांनी सुनावणी घेऊन म्हणणे ऐकून घेतले. माळी व विक्रांत विजय दूध संस्थेने दिलेले म्हणणे ग्राह्य धरून तुकाराम खंडागळे यांची तक्रार फेटाळण्यात आली आहे. दीपक माळी यांना पीर टाकळी येथील ग्रामसेवकाने दिलेला रहिवासी दाखला रद्द झालेला नसल्याने माळी यांचे सभासदत्व आबाधित असल्याचे गावडे यांनी दिलेल्या निर्णयात म्हटले आहे.
मी संघाच्या हिताचा विचार करतो - दीपक माळी
दूध संघ मोठा झाला पाहिजे, असा दूध संघाच्या हिताचा विचार मी करतो. आमचे नेते राजन पाटील यांनी मला प्रामाणिकपणे काम करण्यासाठी मला संचालक म्हणून संधी दिली आहे. राजकीय अकसाने केलेली तक्रार फेटाळण्यात आली व मला न्याय दिला , असे दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी यांनी सांगितले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा