“संवेदनशील मनातून कविता निर्माण होते.” - रवि वसंत सोनार
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
"सामाजिक जीवनात अवती भोवती घडणाऱ्या वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण घटनांचे अवलोकन केल्यास संवेदनशील मनातून कविता निर्माण होते.” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते येथील कवी संदीप सुधीर लोखंडे यांच्या पहिल्या वाहिल्या 'सोबती' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले की - “एखाद्या घटना अथवा प्रसंगाचा आशय किंवा विषय कमीत कमी शब्दांत काव्यबद्ध करणे हे साहित्यिकाचे कौशल्य आहे.”
कवी संदीप लोखंडे यांच्या सोबती या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक मा. बा. ना. धांडोरे, कवी रवि सोनार, व्याख्याते मा. गणेश धांडोरे, मा. चरणदास लोखंडे, मा. प्रवीण भाकरे, प्रा. सविताताई दुधभाते, ग्रा. पं. सदस्य मा. छायादेवी लोखंडे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना मा. बा. ना. धांडोरे म्हणाले - “प्रस्थापित साहित्यिकांनी नवोदितांना मार्गदर्शनपर सहकार्य करावे तसेच पद्य लेखनाबरोबरच गद्य लेखन करण्यासाठीसुद्धा प्रोत्साहित करावे.” यावेळी बोलताना प्रा. सविताताई दुधभाते म्हणाल्या की - “विविध आशय आणि विषयांवरील कविता वाचकांना भावतात. वैविध्यपूर्ण कवितांचा समावेश हे सोबती या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे.”
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना व्याख्याते मा. गणेश धांडोरे म्हणाले की - “कवी आणि लेखकांनी साहित्य लेखन करताना व्याकरण व र्हस्व - दीर्घ याबाबतचे नियम व निकष पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” समीक्षा प्रकाशनच्या वतीने मा. संध्याताई काळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पंढरपूर आणि परिसरातील निमंत्रित कवी आणि कवयित्री यांचे सुश्राव्य असे काव्यसंमेलन संपन्न झाले. या प्रकाशन सोहळ्यात मा. पोलिस निरीक्षक संजय साबळे, मा. विलास जगधने, मा. हिरालाल चंदनशिवे, मा. धिरज लोखंडे, मा. राहूल लवटे याचबरोबर पंढरपूर आणि परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक,कला व क्रीडा तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर तसेच साहित्य रसिक उपस्थित होते.
सदर प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन कवी किरणराज घोडके यांनी केले. तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कवी सूर्याजी भोसले यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कवी संदीप लोखंडे मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा