“पक्षी संरक्षण व संवर्धन हे मानवी कर्तव्य.” - रवि वसंत सोनार
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
“निसर्ग चक्राचा महत्वाचा भाग असणारे परंतु सध्या संख्या घटत चाललेले पक्षी - प्राणी यांचे संरक्षण व संवर्धन हे मानवाचे कर्तव्य आहे.” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या जन्मवर्षाच्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्याने संकल्पित कला, क्रीडा, आरोग्य, साहित्यिक, अध्यात्मिक, शिक्षण, सांस्कृतिक तसेच पर्यावरण विषयक उपक्रमांच्या संकल्पांतर्गत जागतिक चिमणी दिनी संपन्न झालेल्या उपक्रमावेळी बोलत होते. पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले - “वाढत्या शहरीकरणामुळे आणि भौतिक सुखाच्या भोगवादामुळे प्रचंड प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे निसर्गातील अनेक प्राणी पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सर्वांकडून प्राधान्यक्रमाणे त्यांचे संवर्धन करणे ही आजची महत्वाची गरज आहे.”
जागतिक चिमणी दिनी चिमणी व इतर पक्षी यांची माहिती सांगून कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या वतीने कागदी पुठ्ठ्यांच्या नळ्यांपासून बनवलेले पर्यावरणपूरक एक्कावन घरट्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सुप्रभात मित्र परिवाराचे पंढरपूर आणि परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यवसायिक या व इतर विभागातील मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या वतीने इतरही पर्यावरण प्रेमी व्यक्तिंना ही घरटी स्नेहभेट स्वरुपात देण्यात आली.
जागतिक चिमणी दिवसाच्या औचित्याने पंढरपूर आणि परिसरातील पक्षीप्रेमींसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल सुप्रभात मित्र परिवाराच्या मान्यवरांकडून तसेच इतर अनेक क्षेत्रांतील मान्यवरांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा