'ती' च्या जिद्दीची कहाणी - सौ. मेघा हेमंत कुलकर्णी यांनी उभी केली गारमेंट फॅक्टरी
शिवशाही विशेष
जिद्द, चिकाटी, कौशल्य आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर माणूस मोठे ध्येय गाठू शकतो. आणि आपल्या मेहनतीने स्वप्नपूर्ती करू शकतो. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण या सर्व बाबी सत्यात उतरवणारे क्वचितच असतात. खेडेगावात राहून आणि आपल्या शिलाई कामाच्या कौशल्याचा, व्यावसायिक वापर करून, स्वतःची गारमेंट फॅक्टरी उभी करणार्या, सौभाग्यवती मेघा कुलकर्णी यांची कहाणी अशीच प्रेरणादायी आहे.
स्क्रीन प्रिंटिंग चा छोटासा व्यवसाय असणाऱ्या, हेमंत कुलकर्णी यांच्या सोबत लग्न करून, पंढरपूर तालुक्यातील रोपळे या गावात आल्यावर, मेघा ताई यांनी आपल्या पतीच्या प्रिंटींग च्या व्यवसायात लक्ष घातले. त्यात नवनवे प्रयोग करत त्यांनी बनियान आणि टी-शर्टवर प्रिंटींग करण्याचे तंत्र आत्मसात केले. मेघाताई यांना शिलाई कामाची खूप आवड होती. त्यामुळे त्यांनी पतीचा प्रिंटिंग व्यवसाय आणि आपली शिवणकला, यांची सांगड घालत 2011साली टी शर्ट तयार करण्याचा निर्णय घेतला. पती हेमंत यांनी मेघा यांना पूर्ण स्वातंत्र्य दिल्याने, कर्ज काढून त्यांनी चार शिलाई मशीन घेऊन गारमेंट व्यवसाय सुरू केला. टी-शर्ट बनवून त्यावर प्रिंटिंग करून देण्याच्या कामात त्यांना बऱ्यापैकी यश मिळू लागले. या कामात त्यांनी आपले पूर्ण कौशल्य वापरून टी-शर्ट बरोबरच, नाईट पॅन्ट, बरमुडा, थ्रीफोर्थ असे गारमेंट चे विविध प्रकार बनवायला सुरुवात केली. आणि पाहता पाहता महारुद्र गारमेंट ही मेघा हेमंत कुलकर्णी यांची कंपनी नावारुपाला आली.
आज तीन हजार स्क्वेअर फूट जागेत, महारूद्र गारमेंट थाटात उभी आहे. वीस अत्याधुनिक मशीन वर अहोरात्र शिवणकाम सुरू असते. कपड्यावर ॲडव्हान्स डिजिटल प्रिंटिंग या कारखान्यात होते. स्टिचिंग युनिटमध्ये पंचवीस महिला आणि प्रिंटिंग युनिटमध्ये पाच पुरुष अशा एकूण तीस लोकांना ही कंपनी रोजगार देते. नवीन डिझाईन आणि त्याची कटिंग मात्र मेघाताई स्वतः करतात. तसेच कंपनीचे सर्व मॅनेजमेंट सुद्धा मेघाताई खुबीने हाताळतात. तर त्यांचे पती हेमंत हे मार्केटिंगचे काम पाहतात.
महारुद्र गारमेंट कंपनी सध्या टी-शर्ट, नाईट पॅन्ट, बरमुडा, थ्री फोर्थ यासह स्कूल युनिफॉर्म , स्पोर्ट्स वेअर , नाईट वेअर, आणि जशी ग्राहकाची मागणी असेल त्याप्रमाणे उत्पादने तयार करून व प्रिंटिंग करून दिली जातात.
स्त्री ही मुळात शक्तिरूप असून तिने ठरवले तर मोठे दिव्य ती लीलया पार करू शकते. आपल्या छंदाचे व्यवसायात रूपांतर करून, गारमेंट फॅक्टरी सुरू करणाऱ्या, मेघा हेमंत कुलकर्णी यांची कहाणी, त्याचेच उदाहरण आहे, आणि समाजातील महिलांना प्रेरणा देत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा