गाडी अंगावर घालून केला होता दोन शिवसैनिकांचा खून
![]() |
mohol murder case update |
मोहोळ प्रतिनिधी
मोहोळ येथील सतीश क्षीरसागर आणि विजय सरवदे या दोन शिवसैनिकांचा खून केल्याच्या प्रकरणातील पाच फरार आरोपींना, दिनांक 2 ऑगस्ट रोजी, अखेर मोहोळ पोलिसांनी गजाआड केले. कर्नाटकातील आळंद परिसरातून मोहोळ पोलिसांनी त्या पाच आरोपींना ताब्यात घेतले, असून संतोष जनार्दन सुरवसे, रोहित उर्फ अण्णा फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे, आकाश उर्फ गोटू नामदेव बरकडे, संदीप उर्फ गोट्या सरवदे, (सर्वजण रा. मोहोळ) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. सोलापूर विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना नऊ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 14 जुलै रोजी मोहोळ येथील सतीश क्षीरसागर आणि विजय सरवदे, या दोन शिवसैनिकांचा, दुचाकीवर टेम्पो भरून, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खून करून, अपघाताचा बनाव केला होता. यामध्ये सतीश क्षीरसागर हा जागीच ठार झाला होता, तर विजय सरवदे याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात मोहोळ पोलिसांनी भैया असवले, याला ताब्यात घेऊन सुरुवातीला चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
तपासादरम्यान, आणखी दोघांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने, आरोपींची संख्या सहा इतकी झाली होती. मात्र भैया असवले वगळता, उर्वरित पाच आरोपी, पोलिसांच्या हाती लागले नव्हते. त्यामुळे आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी मृतांच्या नातेवाईकांकडून पोलीस प्रशासनासमोर आक्रोश सुरू होता.
मोहोळ पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी, सुरुवातीपासूनच आरोपींच्या मागावर होते. आरोपींच्या मोबाईल टॉवर लोकेशनवर ते सातत्याने नजर ठेवून होते. दरम्यान फरार आरोपी कर्नाटकातील आळंद परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, यापूर्वी त्या ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध पोलिसांनी घेतला होता. मात्र ते तिथे मिळून आले नाहीत. दरम्यान पुन्हा एकदा आरोपी आळंद परिसरात असल्याची, गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक धनाजी खापरे, हेड कॉन्स्टेबल ढावरे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश दळवी, पांडुरंग जगताप, हरीश थोरात, यांच्यासह एका पथकाने सोमवारी दिनांक दोन ऑगस्ट रोजी हिरोळी, तालुका आळंद, येथे साध्या वेषात सापळा लावला होता
सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान, संशयित फरार आरोपी संतोष जनार्दन सुरवसे, रोहित उर्फ अण्णा फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे, आकाश उर्फ गोटू नामदेव बरकडे, आणि संदीप उर्फ गोट्या सरवदे, हे सर्व आरोपी त्या ठिकाणी आले, असता पोलिसांनी गराडा घालून मोठ्या शिताफीने त्यांना पकडले. आणि रात्री पावणे अकरा वाजता सर्व आरोपींना मोहोळ पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सोलापूर जिल्हा विशेष न्यायालयासमोर, हजर केले असता, न्यायाधीशांनी सर्व आरोपींना नऊ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या पूर्वीचे तपास अधिकारी, प्रभाकर शिंदे, हे सेवानिवृत्त झाल्याने, या गुन्ह्याचा पुढील तपास, उपविभागीय पोलिस अधिकारी, सूर्यकांत पाटील, हे करत आहेत.
बनावट मतदार नोंदणी आणि रमाई घरकुल आवास योजनेच्या फाईली, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेल्या वरील आरोपींनी संगनमताने गहाळ करून, भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. या संदर्भात सतीश शिरसागर व विजय सरवदे यांनी आंदोलन करून संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. त्याचा राग मनात धरून हा खून झाला असावा, असा संशय मोहोळ परिसरात व्यक्त केला जात असला, तरी खूनाचे कारण अद्यापही स्पष्ट झालेली नाही. या सर्व आरोपींना अटक झाल्यामुळे, आता या खूनाच्या कारणाचा उलगडा होईल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा