एटीएमची अदलाबदल करून सांगोल्यात वृद्धाला गंडा

सांगोला -( प्रतिनिधी ) सांगोला येथे विठ्ठल राजाराम गुजर ( राहणार अजनाळे , तालुका सांगोला ) या वृद्धाला एटीएम मधून पैसे काढण्यास मदतीच्या बहाण्याने चार जणांनी एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्याआधारे त्यांनी वृद्धाला 78 हजार रुपये परस्पर काढून गंडा घातला. शिरवळ ( तालुका सातारा ) येथे एटीएम कार्ड बदलून लुटणाऱ्या टोळीचा शिरवळ पोलिसांनी छडा लावला होता. त्यातील हे आरोपी असून , त्यांनीच हा गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले आहे .त्यानुसार चौघा जणांना शिरवळ पोलिसांकडून ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले . याबाबत माहिती अशी , विठ्ठल हे बुधवारी ( दिनांक 13 जानेवारी ) दुपारी पावणेतीनच्या सुमारास सांगोला येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी गुजर यांच्या पाठीमागे इतर पाच ते सहाजण पैसे काढण्यासाठी उभे होते. गुजर यांनी पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकले असता पैसे निघाले नाहीत. त्यावेळी पाठीमागील एका व्यक्तीने तुमचे कार्ड ब्लॉक झाले आहे. पैसे निघत नाहीत असे सांगितले. गुजर पैसे काढत असताना त्याने त्यांचा पासवर्ड पाहिला होता. दरम्यान उपस्थित तीन ते चार जणांनी काका तुमचे कार्ड खाली पडले आहे , असे सांगितले. गुजर हे कार्ड घेण्यासाठी खाली वाकले असता एकाने हातचलाखीने गुजर यांच्या जवळील एटीएम कार्ड लांबविले. पैसे निघत नसल्याने गुजर एटीएम बाहेर आले. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांना मोबाईल वर पैसे काढण्याचा मेसेज आला. पैसे न काढता पैसे काढण्याचा मेसेज आल्याने गुजर यांनी स्टेट बँकेच्या सांगोला शाखेत जाऊन एटीएम कार्ड ब्लॉक केले. तोपर्यंत त्यांच्या खात्यातून 78 हजार रुपये काढल्याचे तपासणीत निदर्शनास आले. याबाबत गुजर यांनी सांगोला पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात एटीएम कार्ड वापरून पैसे काढल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यासंदर्भात एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचे चेहरेही स्पष्ट झाले होते. दरम्यान , शिरवळ पोलिसांना अशाच प्रकारे एटीएम बदलून लुटणाऱ्या टोळीचा छडा लागला होता. त्यांना शिरवळ पोलिसांकडून या गुन्ह्यामध्ये वर्ग करून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या राष्ट्रीय व को-ऑपरेटिव्ह बँकांचे सुमारे 62 ए.टी.एम कार्ड मिळून आलेले आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा