रोपळे ग्रामपंचायत रजिस्टर मध्ये खाडाखोड
सरपंच , लिपिक , शिपाई यांचा प्रताप ; गुन्हा दाखल
पंढरपूर - ( प्रतिनिधी ) शासकीय जागेवर केलेला अतिक्रमण लपवून आपल्याच गटाचा उमेदवार सरपंच व्हावा यासाठी ग्रामपंचायतीच्या रजिस्टरमध्ये फेरफार केल्याचे समोर आल्याने रोपळे (ता. पंढरपूर ) येथील सरपंच , लिपिका सह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सरपंच दिनकर नारायण कदम , लिपिक दशरथ मधुकर कदम , व ग्रामपंचायत शिपाई नितीन धनाजी जाधव यांच्याविरोधात ग्रामसेवक नवले यांनी पोलिसात तक्रार दाखल केला. आहे.
याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , रोपळे ग्रामपंचायतीत असलेल्या नमुना आठ रजिस्टर मध्ये गावातील मालमत्ता धारकांची नावे आहेत. याशिवाय भोगवटदारांची नावे , कर वसुलीची माहितीही याच रजिस्टर मध्ये आहे. या माहिती समोर सरपंच यांची सही व ग्रामपंचायतीचा सिक्का असतो. हे रजिस्टर ग्रामसेवकांकडे असते. मात्र या रजिस्टरमधील नोंदी पाहून दाखले व उतारे देण्यासाठी लिपिक दशरथ मधुकर कदम ( राहणार रोपळे ) हे हाताळत होते . ग्रामपंचायतीचे कामकाज संपल्यानंतर शिपाई नितीन धनाजी जाधव (रा. रोपळे ) हा कपाटात ठेवून चावी स्वतःकडे ठेवतो.सध्या रोपळे ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आलेले आहे. 28 जानेवारी रोजी लिपिक दशरथ कदम यांनी ग्रामसेवक नवले यांना फोन केला. माजी सरपंच दिनकर नारायण कदम यांनी रात्री ८.३० ते ९ च्या दरम्यान शिपायाला दमदाटी केली. त्यांच्यामार्फत रजिस्टर घरी नेले. त्यामध्ये खाडाखोड केल्याची माहिती दिली. खाडाखोड केलेले रजिस्टर ग्रामसेवक यांनी स्वतः जवळ ठेवले. 22 फेब्रुवारी रोजी नूतन ग्रामपंचायत सदस्य नितीन कदम ,हनुमंत कदम यांनी ग्रामसेवक नवले यांना नमुना 8 रजिस्टर पाहण्यासाठी मागितले. त्यावेळी त्यातील मालमत्ता क्रमांक १५७९ मध्ये खाडाखोड केल्याचे दिसले. खाडाखोड कोणी केली, असे विचारले असता माजी सरपंच दिनकर कदम यांनी केल्याचे सांगितले. या खाडाखोडत त्यांनी शशिकला दिलीप चव्हाण यांनी मंगल अर्जुन भोसले यांच्याकडून मालमत्ता खरेदी केल्याचे दाखवले आहे. रोपळे गावच्या सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे. त्या प्रवर्गातून शशिकला चव्हाण या एकट्याच निवडून आल्या आहेत. मात्र त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांना सरपंच पदाचा लाभ घेता येणार नाही व ते रद्द होईल म्हणून दिनकर कदम यांनी खाडाखोड केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी ग्रामसेवक कृष्णा नवले यांनी दिनकर नारायण कदम, लिपिक दशरथ मधुकर कदम व ग्रामपंचायत शिपाई नितीन धनाजी जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा