अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतातूर
जिल्ह्यात ठिकठिकाणी फळबागांचे , पिकांचे मोठे नुकसान , रब्बी पिके वाया जाण्याची शक्यता
सोलापूर - ( प्रतिनिधी) गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा शिडकाव झाल्याने जिल्ह्यातील द्राक्ष , गहू , ज्वारी , हरभरा आदी फळपिकांचे रब्बी हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांवर अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे जिल्ह्यातील विविध भागातील प्रतिनिधींनी तेथील नुकसानीची माहिती दिली आहे
पंढरपूर तालुक्यातील करकंब भोसे कासेगाव आदी भागात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बाग आहेत . तर रोपळे, बाभुळगाव तुंगत या भागात उसाबरोबरच गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते . यावर्षी पिके जरा बरी आली होती मात्र या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.
अक्कलकोट तालुक्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे ठिकाणी अवकाळी पावसाचा शिडकावा होत असल्याने तालुक्यातील द्राक्ष , गहू , ज्वारी , हरभरा आदी पिकासह रब्बी हंगामातील पिके संकटात सापडली आहेत.प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गतवर्षीच्या परतीच्या पावसामुळे खरीप पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी पिकावर अवलंबून होती. अक्कलकोट तालुक्यातील तडवळ , सुलेरजवळगे , केगाव , चुंगी , चप्पळगाव, हनूर सह तालुक्यातील ढगाळ वातावरणात सहज अवकाळी पाऊस झाला.दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीत सुरुवात होते व डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडी पडते. रब्बी हंगामातील गहू , हरभरा व इतर पिकांना पोषक असते. परंतु यंदा मात्र थंडीचे प्रमाण कमी असून ही रब्बी पिकाची वाढ चांगल्या प्रकारे झाली होती परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे भविष्य धोक्यात आले आहे.
रब्बी हंगामातील पिके संकटात
उत्तर सोलापूर तालुक्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. द्राक्षाचे दर ही कमी होत चालल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. द्राक्षासव ज्वारी , गहू , हरभरा रब्बी पिकांचे नुकसान होता आहे.बुधवारी रात्री वातावरण अचानक बदल होऊन रात्री दहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसास सुरुवात झाली.कोंडी , नान्नज व वडाळा , पडसाळी, कारंबा व इतर भागात पावसाने हजेरी लावली आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीने खरीप व रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गेल्या वर्षी कोरोनामुळे लोक डाऊन करण्यात आले होते.यामुळे द्राक्षाला बाजारपेठ न मिळाल्याने शेतकऱ्यांना द्राक्षे फेकून द्यावी लागली.
मोहोळ तालुक्यात बुधवारी रात्री दहानंतर वातावरणात अचानक बदल होत ढगाळ वातावरण तयार झाले. रात्रीपासूनच वार्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागायतदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. कालपासूनच वातावरणात थंडी कमी झाली होती. तर बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले. परंतु रात्री उशिरा अचानक विजेचा कडकडाट रिमझिम पावसाला सुरुवात झाली. द्राक्ष , डाळिंब , ज्वारी सह रब्बी पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यातील टाकळी सिकंदर , पाटकुल , पेनुर , कोन्हेरी , येवती ,आढेगाव ,सौंदणे ,औंढी , पुळुजसह परिसरात द्राक्षांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे द्राक्ष बागायतदारांचे कोट्यावधीच्या नुकसानीची शक्यता द्राक्षबागायतदारांनी वर्तवली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा