maharashtra day, workers day, shivshahi news,

खासदार संजय राऊतांच्या पत्नीला ईडीची नोटीस

 

 खासदार संजय राऊतांच्या पत्नीला ईडीची नोटीस

varsha sanjay raut, ED notice, shivshahi news
sanjay raut - varsha raut

मुंबई- (प्रतिनिधी) भाजपाला बाजूला ठेवून महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे, केंद्र सरकार व भाजपावर सातत्याने टीका करणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी ईडीने नोटीस धाडली आहे. मंगळवारी 29 तारखेला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आल्याची माहिती  सूत्रांनी दिली. माध्यमातून ही बातमी येताच सत्ताधारी आघाडीतील पक्षांनी केंद्र सरकारकडून सुडाचे राजकारण केले जात असल्याचा हल्लाबोल केला आहे. आपल्याला यासंबंधी माहिती नाही. नोटीस आल्यास पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडेन, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान'आ देखे जरा, किसमे कितना है दम.... जमके रखना कदम, मेरे साथिया......' असे ट्विट करून संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

           संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. पीएमसी बँकेतील वर्षा राऊत यांच्या खात्यात, प्रवीण राऊत यांच्या खात्यातून काही प्रकारचे व्यवहार झाले असून या व्यवहारा मागील कारण ईडीला जाणून घ्यायचे आहे. त्यासाठीच वर्षा राऊत यांना समन्स बजावण्यात आल्याचे वृत्तवाहिन्यांनी सूत्राचा हवाला देऊन म्हटले आहे. पंजाब अँड महाराष्ट्र बँकेत (पीएमसी) झालेल्या चार हजार तीनशे पस्तीस कोटीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास करत काही आरोपींना अटक केली. त्यानंतर घोटाळ्याची व्याप्ती वाढत जाऊन हा घोटाळा 6 हजार700 कोटीचा असल्याचे उघड झाल्याने, ईडीने याचा पुढील तपास सुरू केला. याप्रकरणी ईडीकडून काही जणांची चौकशी सुरू झाली. संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात वर्षा राऊत यांच्या खात्यात, प्रवीण राऊत यांच्या खात्यातून कर्जासाठी काही रक्कम घेण्यात आल्याचा उल्लेख असून या संबंधीची माहिती ईडीला जाणून घ्यायची आहे. दरम्यान, या नोटीसीनंतर आघाडीतील नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले की, केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून ईडीचा हा खेळ सुरू आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना 
धमकावण्यासाठी ईडीची नोटीस पाठवली जाते. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना नोटीसा पाठवल्या गेल्या. राजकीय द्वेषामुळे भीती निर्माण करण्यासाठी केंद्रीय संस्थांचा वापर केला जात असल्याची टिका मलिक यांनी केली आहे. ही ईडी आहे की वेडी आहे. ईडीचे हे पाऊल अत्यंत निंदनीय असून एवढे घाणेरडे प्रकार होत असतील तर राजकारण कोणत्या स्तरावर जातेय हे दिसते. सत्तेसाठी इतके घाणेरडे प्रकार सुरू आहेत. तर असेच सुरू राहिल्यास ईडी सारख्या संस्थांना टाळे ठोकावे लागेल, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.ईडीसारख्या यंत्रणा चा केंद्र सरकारकडून होत असलेला गैरवापर पाहिला, तर आता या यंत्रणांनी आपले कार्यालय भाजपच्या पक्ष कार्यालयात हलवावे, आसा टोला काँग्रेसने मारला आहे.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !