सुरेश रैना, सुझान खान सह 34 जणांवर कारवाई
मुंबईत ड्रॅगन फ्लाय क्लब वर पोलिसांचा छापा
![]() |
suresh raina |
मुंबई - ( प्रतिनिधी ) करोना संबंधित नियमांचे उल्लंघन करून अंधेरीतील ड्रॅगन फ्लाय क्लबवर सोमवारी रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू असल्याचे उघडकीस येताच पार्टीत सहभागी झालेल्या क्रिकेटपटू, बॉलिवूड सेलिब्रेटी सह इतर 34 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईनंतर त्यांना नोटिसा बजावून सोडण्यात आले. या पार्टीमध्ये क्रिकेटपटू सुरेश रैना सह गायक गुरु रंधवा, अभिनेता हृतिक रोशन ची माजी पत्नी सुझान खान यांच्यासह इतरांचा समावेश होता. या कारवाईबाबत सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी संबंधितावर योग्य कारवाई केल्याचे सांगितले.
अंधेरीतील सहारा परिसरात ड्रॅगन फ्लाय क्लबमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्याची पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर झोनचे पोलीस उपायुक्त राजीव जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकला. या पार्टीत क्रिकेटपटू सुरेश रैना, गायक गुरु रंधवा, अभिनेता हृतिक रोशन ची माजी पत्नी सुझान खान सह इतर काही जण सापडले. या वेळी महिलांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. तर सुरेश रैना, गुरु रंधवा सह 27 आणि क्लबच्या 7 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सहारा पोलीस ठाण्यात 188, सह कलम 269 कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांना नोटिसा बजावून सोडण्यात आले. पार्टीत 19 जण दिल्ली आणि पंजाब हून मुंबईत आले होते. गायक बादशहा कारवाईदरम्यान पळून गेला आहे. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे - पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की, सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. या क्लबमध्ये रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी सुरू नव्हती. मात्र मद्याची पार्टी रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, सुरेश रैना च्या व्यवस्थापकीय टीम कडून एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले. त्यात सुरेश हा एका शूटसाठी मुंबईत आला होता. त्यांच्या एका मित्राने त्याला डिनर साठी निमंत्रण दिले. तो दिल्लीला जाणार होता. यापूर्वी तो क्लबमध्ये डिनर साठी गेला होता. मुंबईतील कोरोना चे नियम आणि वेळेबाबत त्याला काहीच माहिती नव्हती. यापुढे आपण नक्कीच नियमांचे पालन करू, असेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा