maharashtra day, workers day, shivshahi news,

नरभक्षक बिबट्याचा अखेर अंत - करमाळा परिसरातील दहशत संपली

 नरभक्षक बिबट्याचा अखेर अंत - करमाळा परिसरातील दहशत संपली

bibatya-killed, karamala, dhavalsinh mohite-patil, shivshahi news
bibatya-killed
करमाळा - (बातमीदार) अहमदनगर, बीड व सोलापूर जिल्ह्यात तब्बल बारा माणसांचा बळी घेणारा बिबट्या, शुक्रवारी सायंकाळी पावणेसात वाजता, वनविभागाच्या शार्प शुटर कडून ठार करण्यात आला. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा निश्वास टाकला आहे.

मागील पंधरा दिवसापासून या नरभक्षक बिबट्याने करमाळा तालुक्यातील तीन लोकांचा बळी घेतला होता. गेल्या आठवड्यापासून, तो बिटरगाव वांगी, भिवरवाडी या भागात वावरत होता. आणि तीन वेळा त्याने वनविभागाच्या शार्प शूटर्सला चकवा देत पळ काढला होत. तिन्ही वेळा केलेल्या गोळीबारातून तो सहीसलामत सुटून पळाला होता. गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास, राखुंडे वस्तीवरील पांडुरंग राखुंडे, यांच्या केळीच्या शेतात तो वावरत असल्याने, या भागातील नागरिकांना त्याचे दर्शन झाले. ही बातमी वन विभागाला समजतात, 20 ते 25 कर्मचारी, अधिकारी व शार्प शूटर असा लवाजमा बिबट्याला ठार करण्यासाठी, राखुंडे वस्ती परिसरात लावण्यात आला. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुन्हा या बिबट्याचे दर्शन या परिसरात झाले. बिबट्या याच परिसरात असल्याची खात्री झाल्याने शार्प शूटर तावरे आणि त्यांचे सहकारी असलेले, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष, धवलसिंह मोहिते-पाटील, यांनी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास बिबट्याला हेरले. पंचवीस फूट अंतरावरून बिबट्याने वाहनाच्या टपावर बसलेल्या, शार्प शुटर कडे हल्ला करण्याच्या इराद्याने झेप घेतली, परंतु अगदी याच वेळी नेम ठेवून धवलसिंह मोहिते-पाटील यांनी बिबट्याला समोरून गोळ्या घातल्या. पहिल्याच गोळीने बिबट्या गतप्राण झाला होता. परंतु सुरक्षितेसाठी, बिबट्या वर आणखी एक गोळी झाडण्यात आली, बिबट्या ठार झाल्याची खात्री होताच, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनीही ही सुस्कारा सोडला.

बिटरगाव वांगी च्या ग्रामस्थांनी नरभक्षक बिबट्या ठार झाल्याच्या आनंदात एकच जल्लोष केला, महेंद्र पाटील, नागनाथ मंगवडे, रामा धनवे, ज्ञानेश्वर धनवे, सौदागर नलवडे, संजय नलावडे, आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, बीड जिल्ह्यातील आष्टी, तालुक्यातील जोगेश्वरी, पारगाव, तसेच करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी, अंजनडोह, केडगाव, चिखलठाण, वांगी, शिवरवाडी, या परिसरात या नरभक्षक बिबट्याने मागील पंधरा दिवसापासून अक्षरशा थैमान घातले होते. या चार जिल्ह्यातील एकूण बारा लोकांचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्याची दहशत शुक्रवारी अखेर संपुष्टात आली. या नरभक्षक बिबट्याने करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी येथील कल्याण फुंद्रे, अंजनडोह येथील जयश्री शिंदे, तसेच चिकलठाण येते ऊस तोडणी कामगार यांची सात वर्षाची मुलगी मुलगी फुलाबाई, यांचा बळी घेतला होता. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी  या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. तसेच आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, आष्टीचे आमदार सुरेश धस, या लोकप्रतिनिधींनी सुद्धा शासनाकडे या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली होती. तर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री दत्तामामा भरणे, खासदार रणजीतसिंह नाईक - निंबाळकर, आमदार रोहित पवार, आदी नेत्यांनी, बिबट्याने थैमान घातलेल्या परिसराला भेटी दिल्या होत्या. वनविभागाने ही या बिबट्याच्या बंदोबस्तासाठी,  21 पिंजरे, 32 कॅमेरे, 42 ट्रॅक कॅमेरा, ५ शार्प शूटर,  दोन बेशुद्ध करणारे पथक, डॉग स्कॉड, अशा वेगवेगळ्या सोळा टिम द्वारे दीडशे कर्मचाऱ्यांसह गेले अठरा दिवस सर्च ऑपरेशन चालवले. यादरम्यान तीन वेळा बिबट्याला पकडण्यात किंवा ठार करण्यात वन विभागाला अपयश आले होते. यापूर्वी तीन वेळा टीमने केलेल्या गोळीबारातून हा बिबट्या सहीसलामत सुटला होता. त्यामुळे हा नरभक्षक बिबट्या कधी जेरबंद होतो, याची तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात उत्सुकता लागून राहिली होती. अखेर शुक्रवारी वनविभागाच्या टीमला या नरभक्षक बिबट्याचा खात्मा करण्यात यश आल्याने, करमाळा तालुका आणि परिसरातील नागरिकांनी अखेर सुटकेचा श्वास सोडला.

या संपूर्ण मोहिमेत वन अधिकारी संजय कडू, जिल्हा उपवन अधिकारी धैर्यशील पाटील, सहाय्यक वन अधिकारी श्री हाके, वनपरिक्षेत्र अधिकारी इरशाद शेख, सचिन रगतवान, विजय भाटे, करमाळा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नागराळे, शार्प शूटर डॉक्टर चंद्रकांत मंडलिक, हर्षवर्धन तावरे, आदींनी विशेष मेहनत घेतली. या मोहिमेत अखेर नरभक्षक बिबट्या ठार झाल्याने स्थानिक पोलिस प्रशासन आणि वन विभागाची एक मोठी डोकेदुखी संपली आहे. परंतु या परिसरात आणखी काही बिबटे असल्याची शंकाही व्यक्त करण्यात येत आहे. आणि त्याच्या संदर्भात वेगाने पसरणाऱ्या अफवा पिकत असल्याने नरभक्षक बिबट्या नंतर आता या अफवांना आळा घालण्याची कामगिरी प्रशासनाला करावी लागणार आहे



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !