सोलापुरात अवैद्य धंदेवाल्यांना सिम कार्डची बेकायदेशीर विक्री
दुकानदारासह ६ जण गजाआड; १३ मोबाईल, १२ सिम कार्ड जप्त
![]() |
mobile sim card |
सोलापूर-(प्रतिनिधी) दुकानात सिमकार्ड खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची कागदपत्रे स्कॅन करून, त्यांच्याच नावावर घेतलेले नवीन सिमकार्ड अवैद्य धंदेवाल्यांना बेकायदेशीररित्या विकणार्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दुकानदारासह ६ जणांना गजाआड केले असून, १३ मोबाईल व १२ कार्डही जप्त केले आहेत.
गोपाल मुंदडा (रा. बलिदान चौक) असे दुकानदाराचे नाव आहे. राजेंद्र नागनाथ मल्लू रे (वय ३७, रा. भवानी पेठ ), स्वामी दुर्गा वरगंटी (रा. भवानी पेठ, वैदवाडी), कमलकिशोर नंदकिशोर अटल (वय, ३८ रा. गुरुदत्त चौक, घोंगडे वस्ती), नागेश सुभाष येळमेली (वय ३२, रा. शाहीर वस्ती, पाणी पेठ), महांतया गुरय्या स्वामी (३२,रा. जंगम वस्ती, अक्कलकोट रोड) अशी सीम कार्ड खरेदी करणाऱ्यांची नावे आहेत.
शहरात अवैद्य धंदे करणाऱ्यांना दुसऱ्यांच्या नावे असलेले सिम कार्ड विक्री होत असल्याच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या. जोडभावी पोलीस ठाण्यात या प्रकाराबाबत गुन्हाही दाखल झाला होता. त्या अनुषंगाने पोलीस येथील बलिदान चौकातील गोपाल मुंदडा यांचे खाऊ घर जनरल स्टोअर्स वर छापा टाकला. दुकानाचा मालक मुंदडा हा सिम कार्ड खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांचा रहिवासी दाखला, आधार कार्ड, पनकार्ड अशी कागदपत्रे तीन ते चार वेळा स्कॅन करुन घेत होता. त्याशिवाय एकत्र ग्राहकाचे दोन ते तीन वेळा आपल्या मोबाईलवर फोटो काढून घेत होता. ग्राहक गेल्यानंतर त्यांच्याकडून घेतलेल्या कागदपत्रांच्या व जास्त काढून घेतलेल्या फोटो आधारे तो अवैद्य धंदे करणाऱ्यांना ४०० ते ५०० रुपयांना दुसऱ्यांच्या नावावरचे सिम कार्ड विकत असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले. पोलिसांनी संशयित आरोपी कडून १३ मोबाईल व १२ सिम कार्ड असे ७५ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे, फौजदार बायस, होटकर, हवालदार कुलकर्णी, पोलीस नाईक सचिन गायकवाड, संतोष येळे, बाबू मंगरुळे, पोलीस कॉन्स्टेबल शेख, गायकवाड, कानडे, माने व पथकाने पार पाडली.
अशी होत आहे ग्राहकांची फसवणूक
सिम कार्ड खरेदी करण्यासाठी ग्राहक आला असता ओळखपत्र व रहिवासी पुराव्याची कागदपत्रे विशिष्ट मोबाईल मध्ये स्कॅन करून घेतली जात असत. ग्राहक गेल्यानंतर त्याच्या कागदपत्रांचा गैरवापर करून विविध कंपन्या चे सिम कार्ड चालू करून घेतले जायचे. ती सुरू झालेली सिमकार्ड अवैद्य धंदे करणाऱ्यांना जास्तीचे पैसे घेऊन विकली जात होती. गेल्या अनेक वर्षापासून हा बनावटगिरीचा व्यवसाय सुरू होता.
नागरिकांनी सिम कार्ड विकत घेताना खबरदारी घ्यावी. आपण कागदपत्रे देताना कशासाठी देत आहोत याचा उल्लेख त्या कागदपत्रांवर करावा
.- बापू बांगर (पोलीस उपायुक्त)
बनावट कागदपत्र आधारे कार्यान्वित केलेली सर्व सिम कार्ड हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्यांच्या नावावरील सिम कार्ड वापरणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली जाईल. याचा वापर कोणत्या अवैध धंदा करता केला याचाही तपास सुरू आहे.- बजरंग साळुंखे (पोलीस निरीक्षक)
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा