डॉक्टर होण्याआधीच ऋतूजाचा काळाने घेतला घात
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा ( प्रतिक सोनपसारे )
डोळ्यात डॉक्टर होण्याची स्वप्ने, मनात जिद्द आणि घरच्यांच्या आशा… पण नियतीने एका क्षणात सगळेच संपवले. डोंगरशेवली येथील होतकरू विद्यार्थिनी ऋतूजा गणेश सावळे (वय १९) हिचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने बुलढाणा जिल्हा सुन्न झाला आहे.
राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणारी ऋतूजा रोजप्रमाणे कॉलेजकडे निघाली होती. सकाळचे साडेआठ वाजताच बजाज चेतकवरून सुरू झालेला प्रवास तिच्या आयुष्याचा शेवट ठरेल, याची कल्पनाही कुणाला नव्हती. गावापासून काही अंतरावरच भरधाव दुचाकीने दिलेल्या जबर धडकेने तिचे स्वप्न अक्षरशः रस्त्यावरच चिरडले गेले. तोल जाऊन डोके बसवर आपटले आणि क्षणात सगळे संपले.
ऋतूजा केवळ विद्यार्थिनी नव्हती, ती कुटुंबाच्या आशांची शिदोरी होती. डॉक्टर बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आई-वडिलांनी कष्टाची पराकाष्ठा केली होती. एमबीबीएससाठीही पात्र ठरलेली ही हुशार मुलगी समाजासाठी काहीतरी करणार होती. पण बेशिस्त वाहतूक, अपघातप्रवण रस्ते आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एका निष्पाप जीवाची आहुती गेली.
जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित करताच डोंगरशेवली गावासह महाविद्यालय परिसरात शोककळा पसरली. प्रश्न मात्र अनुत्तरितच आहेत.
आणखी किती ऋतूजांची स्वप्ने रस्त्यावर सांडणार?वाहतूक अराजकतेला आवरण कधी बसणार?
डॉक्टर होण्याआधीच मृत्यूने तिला गाठले… आणि बुलढाण्याच्या रस्त्यांवर पुन्हा एक हळहळणारी शांतता पसरली.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














