पंचरंगी लढतीत गुलाल कोणाचा?
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई शहरात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि काँग्रेस असे पाच प्रमुख पक्ष रिंगणात उतरल्याने यंदाची निवडणूक ऐतिहासिक ठरत आहे. त्यातच तिकिट न मिळालेल्या नाराजांनी अपक्ष म्हणून दंड थोपटल्याने वाईच्या राजकीय आखाड्यात 'काटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे.
"वाईकरांचा कौल नेहमीच विकासाला असतो, पण यंदा पक्षांची झालेली मोडतोड मतदारांना गोंधळात टाकत आहे. काही प्रभागात उमेदवारांचा वैयक्तिक जनसंपर्क पक्षाच्या चिन्हापेक्षा वरचढ ठरू शकतो." प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. पाणीपुरवठा, रस्त्यांची कामे आणि नदी घाट सुशोभीकरण यांसारख्या स्थानिक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न करत होते.
वाईत सध्या तरी कोणा एका पक्षाची लाट दिसत नसून, लढत अत्यंत चुरशीची आहे. निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल की, वाईकर 'घड्याळा'च्या कोणत्या वेळेला जुळतात, 'कमळ' फुलवतात, 'धनुष्या'ची दोरी ओढून 'तुतारी' वाजवतात!
भाजपाचे ना. जयकुमार गोरे, माजी आ. मदन भोसले, राष्ट्रवादी (अजित पवार)चे ना. मकरंद पाटील, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)चे डॉ. नितीन सावंत या दिग्गजांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे निवडणुकीत काही विशिष्ट आणि महत्त्वाचे बदल दिसून आले आहेत.
भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार)च्या नेत्यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रचंड ताकद आणि संसाधने वापरली आहेत. परिणामी प्रभागांमध्ये विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीचे आश्वासन दिले गेले आहे. त्यामुळे मतदारांना 'सत्तेचा फायदा' मिळेल, अशी आशा दाखवली गेली आहे, ज्यामुळे निवडणुकीचे पारडे भाजपाच्या बाजूने झुकू शकते.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खासकरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्या फुटीचा मुद्दा भावनात्मक बनवला आहे. परिणामी काही प्रभागांमध्ये मतदारांनी 'जुन्या' नेतृत्वाशी निष्ठा दाखवत सहानुभूतीच्या आधारावर मतदान केले असावे. यामुळे मविआच्या उमेदवारांना अनपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.
जेव्हा प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागते, तेव्हा बंडखोर अपक्ष उमेदवारांची किंमत वाढते. जर निकालात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली, तर हे प्रभावी नेते अपक्षांना आपल्या बाजूने घेण्यासाठी 'घोडेबाजार' करतील. अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी नेत्यांचे व्यक्तिगत वजन आणि दिलेले राजकीय आश्वासन निर्णायक ठरेल.
वाई नगरपरिषदेचा अंतिम निकाल हा केवळ 'कोणी किती रस्ते केले' यावर नाही, तर 'वाईचा मतदार आजही कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवतो' यावर शिक्कामोर्तब करणारा ठरणार आहे. जर भाजपा किंवा राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला स्पष्ट बहुमत मिळाले, तर स्थानिक आमदारांचे आणि भाजपच्या नेत्यांचे वर्चस्व जिल्ह्याच्या राजकारणात अधिक मजबूत होईल.
जर मविआने अनपेक्षितरित्या जागा मिळवल्या किंवा अपक्षांना सोबत घेऊन सत्ता मिळवली, तर पक्षातील फुटीनंतरही मतदार जुन्या नेतृत्वाच्या पाठीशी ठाम आहेत, हा संदेश जाईल. ही निवडणूक आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी वाईतील जनतेचा कल दर्शवणारी 'सेमी-फायनल' असेल.
वाई आणि सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, राज्यात महायुती असली तरी शहरात अजित पवार गट आणि भाजपा यांच्यात थेट सामना आहे. स्थानिक आमदारांची ताकद अजित पवारांच्या गटाकडे असली, तरी भाजपाला मानणारा मोठा वर्ग आणि भावनिक लाट कोणाच्या बाजूने कौल देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
वाईच्या राजकारणात भाजप नेते मदन भोसले यांची भूमिका नेहमीच निर्णायक असते. यंदा भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट अशी 'महायुती' असली तरी, स्थानिक पातळीवर झालेली धुसफूस आणि अंतर्गत गटबाजीचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व धामधुमीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपली पारंपारिक मते टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष या लढाईत उतरलेला असला तरी नगराध्य पदाची आग्रही मागणी आणि स्थानिक आघाडीतील कुरबुर यामुळे नगरसेवक पदासाठी एकही जागा नसताना थेटच्या उमेदवाराने कोणालाही विश्वासात न घेता एकला चलो रे ची भूमिका घेतल्याने थोडी अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे जाणकारांचे मत आहे. किती जागा मिळाल्या आणि तिथे घटक पक्षांचे काम झाले का, यावर काँग्रेसचे यशापयश अवलंबून असेल.
प्रमुख ५ पक्ष असल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. परिणामी, प्रत्येक प्रभागात प्रबळ अपक्ष उमेदवार उभे राहिले आहेत. हे अपक्ष उमेदवार कोणाचे गणित बिघडवणार? मतांचे विभाजन होऊन अनपेक्षित उमेदवार बाजी मारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














