वाहनचालक व स्थानिक नागरिकांमधून ठेकेदारावर कारवाईची मागणी
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
वाई –जोर रस्त्यावर वाई ते एकसर गावाच्या हद्दीत बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम युध्द पातळीवर चालू आहे. रस्त्याच्या ठेकेदाराने रस्त्यावर फक्त खडी टाकल्याने प्रचंड प्रमाणात घसरडे झाले असून अनेक ठिकाणी खड्डे पडून वाहन चालकांना रस्त्यावरून वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सिद्धनाथवाडी पासून एकसर पर्यन्त रस्त्यावर खड्डे आहेत कि खड्ड्यातून रस्ता हेच कळणे बंद झाले आहे. खडीवरून वाहन चालविताना गाडी घसरण्याच्या घटना अनेक घडल्या आहेत.
तसेच रस्त्याच्या कामात डांबराचा वापर न केल्याने रस्त्यावरील खडी रस्त्याच्या बाजूला एकत्र झालेली आहे. त्यामुळे सिद्धनाथवाडी ते मालकमपेठ रस्त्यावरून गाडी चालवून दाखवा एक हजार बक्षीस मिळवा अशी काहीशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे संबधित बांधकाम विभागाने ठेकेदारावर त्वरित कारवाई करून योग्य पद्धतीने रस्त्याचे काम करण्यास भाग पडावे अन्यथा वाहन चालक व स्थानिक नागरिक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
दररोज या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये अनेकांचे जीव जावून कित्येक जण कायमचे अपंग झाले आहेत, तर अनेकांना कायमचा पाठीचा आजार सुरु झाला आहे, डॉक्टर तज्ञांच्या मते रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे मणक्यामध्ये गॅप तयार होवून अनेकांची कायमची गाडी चालविणे बंद झाले आहे. वाहनांचे होणारे नुकसान वेगळेच! शासनाला भरला जाणार टॅक्स हा कोणत्या कारणासाठी भरण्यात येतो हेच अजून सर्वसामान्य जनतेला समजलेले नाही.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहन चालक, पाचगणी महाबळेश्वरला येणारे पर्यटक हा धोम- बलकवडी धरणांना भेट दिल्या शिवाय परतीच्या मार्गाने जात नाहीत. सुट्टीच्या दिवशी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते, त्यामुळे रस्त्याची अवस्था बिकट होवूनही दुरुस्ती केली जात नाही, हे कसले पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार! या ठिकाणी येणारा पर्यटक पूर्णपणे हैराण होताना दिसत आहेत. काही पर्यटक जाहीर नाराजी व्यक्त करीत आहेत, बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गेले कित्येक दिवस झाले रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असताना संबंधित ठेकेदार तात्पुरती मलमपट्टी करण्यात व्यस्त दिसत, तसेच रस्त्यावर माती युक्त खडी टाकल्याने प्रचंड धुराचे लोट उडत असून अनेकांना श्वसनाचा त्रास होत आहे. तसेच वाईतून धोम धरणाकडे जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता असल्याने पर्यटकांमध्ये प्रचंड नाराजी पहायला मिळत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने ठेकेदाराला पाठीशी न घालता योग्य पद्धतीने काम करून घ्यावे अन्यथा त्याला काळ्या यादीत टाकून पुन्हा कोणत्याही रस्त्याचे काम देण्यात येवून नये. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार थांबवावा अशीही मागणी जोर धरत आहे. रस्त्यावरून साधे चालणेही सोपे राहिले नाही. तालुक्यातील सर्वच रस्त्यांची अवस्था बिकट आहे, यामध्ये वाई-सुरूर, वाई-पाचगणी, वाई-जोर, वाई-जांभळी या वाई शहराशी निगडीत असणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक असते.
पाचगणी-महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांची सख्या मोठ्या प्रमाणात आहे. दररोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या कमी नाही.यांनाही याचा दररोज त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचे कारण पुढे करत संबंधित विभागाने खड्डे बुजविण्याच्या कामात चालढकल केली आहे, परंतु यापुढे असे चालणार नाही. तरी तालुक्यातील मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीची कामे त्वरित करावीत व लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार थांबवावा, अशी मागणी जोर धरत आहे. वाईच्या पश्चिम भागात साठ ते सत्तर किलोमीटर अंतरात शंभर गावातील नागरिकांना रस्त्याचा वापर करावा लागत आहे. रस्त्याच्या साईड पट्ट्याच प्रचंड प्रमाणात खचल्या असल्याने त्याच अपघातास निमंत्रण देत आहेत.
रस्ते दुरुस्तीच्या कामाला निधी उपलब्ध असताना संबंधित विभागाकडून रस्त्यांची झालेली चाळण दुरुस्त केली जात नाही यासारखे मोठे दुर्दैव नाही. एखादा मोठा अपघात होण्याची वाट संबंधित विभाग पाहताय-कि-काय हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. तरी संबंधित ठेकेदारावर त्वरित कारवाई करून रस्त्याची दुरुस्ती योग्य पद्धतीने करावी अशी मागणी जोर धरत आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














