पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांचे आवाहन, कडेगाव येथे नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक स्पर्धांच्या विजेत्यांचा गौरव
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - अभ्यासात प्रगती करतानाच विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा. खेळांमुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढण्यासोबतच आत्मविश्वास, शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे प्रतिपादन वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी केले.
कडेगाव पुल येथे दुर्गामाता नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. गेल्या आठ दिवसांपासून येथे वैयक्तिक व सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपले कलागुण सादर केले. स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
मोबाईलच्या आहारी न जाता मैदानाशी नाते जोडा!
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांचा मोबाईल आणि सोशल मीडियाकडे वाढणारा कल लक्षात घेता, त्यांनी त्याच्या अतिवापरापासून दूर राहणे आवश्यक आहे. मैदानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामूहिक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा मिळते. त्यामुळे अभ्यासासोबतच शारीरिक आणि मानसिक विकासालाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन सूर्यवंशी यांनी केले.
या कार्यक्रमाला दैनिक सकाळचे प्रतिनिधी प्रशांत थोरवे आणि व्याजवाडीचे उपसरपंच संतोष पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. मंडळाच्या अध्यक्षा चारूलता सुतार, शंकर दुधे, बाळासाहेब चव्हाण, रामचंद्र मदने, दिलीप दुधे, उत्तम बामने, श्रीरंग चव्हाण, अमोल दुधे, सूरज राजपुरे, किरण जाधव, प्रमोद पवार, सूरज जाधव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उद्योजक गणेश मदने यांनी मानले. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात बक्षीस वितरण समारंभाची सांगता झाली.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











