ग्रामीण कथांच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी स्पर्धा उत्साहात संपन्न
मराठी साहित्यातील अजरामर त्रिमूर्ती—ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील, द. मा. मिरासदार आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्कार भारती, सातारा जिल्हा समितीतर्फे आयोजित जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत अमितकुमार शेलार यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कथा सादर करत प्रथम क्रमांक पटकावला. या यशासह त्यांची पुणे येथे रंगणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या शाहू सभागृहात ही चुरशीची स्पर्धा रंगली. स्पर्धेत सुधाकर माने यांनी द्वितीय, तर साईशा केसकर यांनी तृतीय क्रमांक संपादन केला. ईशान केसकर आणि मुग्धा देशपांडे यांच्या आश्वासक सादरीकरणास उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे नेमके व परखड परीक्षण शेखर कुलकर्णी आणि नरेंद्र आमले यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक शिवराज ढाणे उपस्थित होते. दोघांनीही संस्कार भारतीच्या या उपक्रमाचा गौरव करत, "नव्या पिढीत समृद्ध मराठी साहित्याची अभिरुची रुजवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे," असे मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर संस्कार भारती सातारा जिल्हा समितीचे अध्यक्ष दिलीप चरेगावकर, सचिव प्रदीप इनामदार, महामंत्री प्रशांत कुलकर्णी, कोषाध्यक्ष अभय पटवर्धन आणि दोन्ही परीक्षक उपस्थित होते. संस्कार भारतीच्या ध्येयगीताने वातावरण भारून गेले. प्रास्ताविकात दिलीप चरेगावकर यांनी स्पर्धेमागील भूमिका विषद केली.
परीक्षक शेखर कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "कथाकथन हा मराठी मातीचा समृद्ध पण काहीसा दुर्लक्षित कलाप्रकार आहे. त्याला नवसंजीवनी देण्यासाठी अशा स्पर्धा सातत्याने व्हायला हव्यात." तर दुसरे परीक्षक नरेंद्र आमले यांनी, "कथाकथनात केवळ भाषेचे सौंदर्य पुरेसे नसून नवरसांचा जिवंत प्रत्यय श्रोत्यांना मिळणे आवश्यक असते. साहित्यातील अलंकृत भाषेपेक्षा अस्सल बोलीभाषेचा लहेजा कथेला जिवंत करतो," असा मौलिक कानमंत्र स्पर्धकांना दिला.
बहुतांश स्पर्धकांनी शंकर पाटील, द. मा. मिरासदार आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्या ग्रामीण धाटणीच्या व मानवी भावभावनांचा ठाव घेणाऱ्या कथा प्रभावीपणे सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
स्पर्धेचे नेटके संयोजन संस्कार भारतीच्या नाट्यविधा प्रमुख रसिका केसकर यांनी केले; त्यांना वर्षा साबडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संस्कार भारतीचे प्रचार प्रमुख मुकुंद फडके यांनी केले, तर वर्षा साबडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी संस्कार भारतीचे सहसचिव संजीव आरेकर, प्रांत सदस्य मधुसूदन पत्की, कोषप्रमुख केशव कुलकर्णी यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी व पदाधिकारी उपस्थित होते.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











