प्रभारी मुख्याध्यापक धर्मेंद्र दीक्षित निलंबित
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे )
वाई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खावली येथील शिक्षिका आणि विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी प्रभारी मुख्याध्यापक धर्मेंद्र विष्णू दीक्षित यांना जिल्हा परिषद सेवेतून अखेर निलंबित करण्यात आले आहे.
या प्रकरणाची जि. प. अध्यक्षा प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजे भोसले शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांनी दखल घेत
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती वाई यांच्या अहवालानुसार धर्मेद्र दीक्षित यांनी शिक्षण सेविका उज्वला गोपाळ जाधव तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात १६ जुलै २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४ अंतर्गत कारवाई करत धर्मेंद्र दीक्षित यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
निलंबन काळात त्यांचे मुख्यालय कराड येथे राहणार असून, या कालावधीत त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याकडील सर्व प्रशासकीय कामकाज इतर कर्मचाऱ्याकडे सोपविण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत.
याशिवाय, या प्रकरणी धर्मेंद्र दीक्षित यांच्याविरोधात विभागीय खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
महिला शिक्षिकेला मारहाण झालेली घटना गांभीर्याने घेतली असून, संबंधित प्रकरणाची चौकशी वाई गटशिक्षणाधिकाऱ्यांनी करून वरिष्ठ प्रशासनास अहवाल सादर केला होता. हा अहवाल मिळताच विनाविलंब धमेंद्र दीक्षित याच्यावर निलंबनाची कारवाई केली गेली.
अनिस नायकवडी
शिक्षणधाकारी प्राथमिक
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



