अकलूज पोलिसांची तत्काळ हालचाल
शिवशाही वृत्तसेवा ,अकलूज (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
श्रीपूर (ता. माळशिरस) येथील महाळुंग मायनर परिसरात एका अल्पवयीन विद्यार्थिनीला ऊसाच्या शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अकलूज पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पीडित मुलीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून, या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. जीवन जयंत घाडगे (रा. मायनर महाळुंग) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
बुधवारी (दि. २४ जून) सकाळी साडेदहाच्या सुमारास १३ वर्षीय विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेत जात होती. यावेळी आरोपी जीवन घाडगे याने दुचाकीवरून येऊन तिला अडवले. मुलीने शाळेला उशीर होत असल्याचे सांगून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला धमकावले. "थांब, नाहीतर मारून टाकीन," अशी धमकी देत त्याने तिची छेड काढली आणि तिला बळजबरीने जवळच्या ऊसाच्या शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थिनीचे धाडस आणि शाळा प्रशासनाची तत्परता
भीतीदायक प्रसंगातही पीडित मुलीने न घाबरता प्रसंगावधान राखले आणि आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत थेट घर गाठले. तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना आणि शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग बनसोडे यांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्याध्यापकांनी तत्काळ पालकांशी संपर्क साधला आणि शाळा प्रशासनाच्या वतीने निर्भया पथक तसेच अकलूज पोलिसांना पाचारण केले.
पोलिसांची रात्रभर शोधमोहीम
उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाच्या प्रमुख पीएसआय करिष्मा वनवे आणि त्यांच्या टीमने (सपोनी वाघमोडे, टेंगले व इतर पोलीस कर्मचारी) आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली. अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपी जीवन घाडगे याला बेड्या ठोकल्या.
आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पॉक्सो कायद्याच्या विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पीएसआय करिष्मा वनवे करत आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



