'माध्यमांतर’ विषयावर वाईतील वसंत व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफले - रामभाऊ जोशी जीवन प्रवास पुस्तकाचे प्रकाशन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई येथे लो.टिळक स्मारक संस्था संचलित वसंत व्याख्यानमालेचे ११० व्या ज्ञानसत्राचे उद्घाटन उत्साहात पार पडले. प्रमुख वक्ते म्हणून दैनिक सकाळचे संपादक ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त अनिल जोशी होते.
सम्राट फडणीस आपल्या व्याख्यानात सध्याच्या माध्यमविश्वातील बदलांवर भाष्य करताना म्हणाले , “आजचा काळ माध्यमांच्या विश्वासार्हतेसाठी अत्यंत संवेदनशील आहे. पारंपरिक माध्यमांवरील विश्वास कमी होत चालला असून सोशल मीडियावरील अप्रमाणित माहितीचा प्रसार मोठ्या धोक्याचे रूप घेत आहे. काही वेळा ही माहिती कोरोनासारख्या आपत्तीपेक्षाही अधिक घातक ठरू शकते. चुकीच्या माहितीचे परिणाम किती व्यापक असू शकतात, याची जाणीव आपल्याला विविध घटनांतून होते. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे मोठ्या शहरांत अचानक प्रचंड गर्दी जमण्याच्या घटना घडल्या आहेत. यावरून माध्यमांचा प्रभाव किती खोलवर पोहोचतो हे स्पष्ट होते. माध्यमे ही केवळ अभ्यासक्रमातील बाब नाहीत; ती समाजाच्या विचार प्रक्रियेवर परिणाम करणारी शक्ती आहे आणि या परिणामांपासून कोणीही पूर्णपणे मुक्त राहू शकत नाही.
माध्यमांचा इतिहास पाहिला तर सुरुवातीला शिल्पकला, भित्तिचित्रे यांसारख्या माध्यमांतून संवाद साधला जात होता. कातळ शिल्पे ते भीम बेटका येथील शिल्पांपर्यंत सर्व माध्यमांचे पहिले रूप आहेत. त्यानंतर श्रुती परंपरेतून मौखिक स्वरूपात ज्ञानाचा प्रसार .झाला. पुढे छापखान्याच्या शोधामुळे मुद्रित माध्यमांचा उदय झाला आणि माहितीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार शक्य झाला. आज इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांनी या प्रक्रियेला वेग आणि व्यापकता दिली आहे. पूर्वी माध्यमे लोकांना आवश्यक ती माहिती देत असत; परंतु आजची माध्यमव्यवस्था वापरकर्त्यांना कोणती माहिती दाखवायची हे स्वतः ठरवते. एका रात्रीत डेटा स्वस्त झाल्यानंतर या प्रक्रियेला अधिक गती मिळाली आणि माहितीचा प्रचंड साठा निर्माण झाला. मात्र या साठ्यातून काय दाखवायचे हे माध्यमांच्या हातात गेले. आजचा काळ ‘अटेंशन इकॉनॉमी’चा आहे. प्रत्येक माध्यमाचे उद्दिष्ट तुमचे लक्ष जास्तीत जास्त वेळ आपल्या प्लॅटफॉर्मवर टिकवून ठेवणे हेच आहे. तुम्ही जितका वेळ स्क्रीनवर घालवाल, तितकी त्यांची अर्थव्यवस्था वाढते. याच प्रक्रियेत आपण ‘प्रोज्युमर’ बनलो आहोत, म्हणजेच आपणच माहितीचे उत्पादक आणि ग्राहक दोन्ही आहोत. सोशल मीडियाच्या अल्गोरिदममुळे ‘फिल्टर बबल’ आणि ‘इको चेंबर’ तयार होतात. तुम्हाला जे आवडते, जे तुम्ही पाहता, त्याच प्रकारची माहिती तुम्हाला पुन्हा पुन्हा दाखवली जाते. त्यामुळे भिन्न मत, वेगळा दृष्टिकोन किंवा व्यापक वास्तव तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. परिणामी, जगाबद्दल एक मर्यादित आणि एकतर्फी समज तयार होते. पूर्वी पुस्तक वाचून, विविध स्रोतांचा अभ्यास करून माणूस स्वतःचे मत तयार करत असे. आता मात्र माध्यमे आधीच तुमचा दृष्टिकोन ठरवतात आणि त्यानुसार माहिती तुमच्यासमोर ठेवतात. ‘अजेंडा सेटिंग’ ही संकल्पना जागतिक पातळीवर आणि स्थानिक राजकारणातही स्पष्टपणे दिसून येते. मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या अति वापरामुळे एकाग्रतेवर गंभीर परिणाम होत आहेत. सतत बदलणाऱ्या दृश्यांमुळे लक्ष स्थिर ठेवण्याची क्षमता कमी होत चालली आहे. सतत काहीतरी हलते चित्र बघण्याची खोड आज पाच वर्षीय मुलापासून ८० वर्षीय आजोबांपर्यंत सर्वांनाच लागली आहे. आज लहान मुलांचा ‘अटेंशन स्पॅन’ अत्यंत कमी झालेला दिसतो. ही चिंतेची बाब आहे.माहितीचे संक्षिप्तीकरण हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हजार पानांचे पुस्तक शंभर पानांत आले, ते काही मिनिटांच्या व्हिडिओत आले, त्यानंतर काही सेकंदांच्या रीलमध्ये आले. या प्रक्रियेत महत्त्वाचे संदर्भ आणि सखोलता गळून पडते. परिणामी, माहिती अपुरी आणि अपूर्ण राहते. डिजिटल माध्यमांमुळे ‘डिजिटल अँम्नेशिया’ वाढत आहे. लोक माहिती लक्षात ठेवण्याऐवजी ती शोधण्यावर अवलंबून राहतात. ‘फॉरवर्ड’ संस्कृतीमुळे कोणतीही माहिती तपासल्याशिवाय पुढे पाठवली जाते, ज्यामुळे चुकीची माहिती वेगाने पसरते आणि मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. फॉरवर्ड या आजाराची लागण आज अनेकांना झालेली दिसते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे कोणाचाही फोटो, व्हिडिओ किंवा माहिती सहजपणे बदलता किंवा बनावट तयार करता येते. त्यामुळे माहितीचा अंधपणे स्वीकार करणे धोकादायक ठरते. आता माहितीची पडताळणी करणे ही अत्यावश्यक बाब बनली आहे.
जगातील काही देश या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. नॉर्वे सारख्या ठिकाणी शिक्षणपद्धतीत बदल केले जात आहेत, तर अमेरिकेत स्क्रीन टाइम कमी करण्यावर भर दिला जात आहे. मात्र भारतात या संदर्भात अजून ठोस पावले उचलली गेलेली दिसत नाहीत." व्याख्यानाच्या शेवटी फडणीस यांनी " माध्यमे पूर्णपणे वाईट नाहीत; परंतु त्यांचा वापर कसा करायचा हे महत्त्वाचे आहे. माहितीचा स्वीकार करण्यापेक्षा तिचा शोध घेणे आवश्यक आहे. माध्यम साक्षरता ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज आहे. पुढील पिढीला स्वच्छ, सत्य आणि विश्वासार्ह माहिती देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.” असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाची सुरुवात अंजली काणे यांच्या पुढाकाराने महिलांनी सादर केलेल्या ‘शिवतांडव स्तोत्रा’ने मंगलमय झाली. यावेळी अनिल जोशी लिखित ‘रामभाऊ जोशी : जीवनप्रवास’ या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष डॉ. चिंतामणी केळकर यांनी केले.संचालक आदित्य चौंडे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर व भद्रेश भाटे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. कार्याध्यक्षा तनुजा इनामदार यांनी व्याख्यानमाले विषयी माहिती दिली. संचालक आनंद शेलार यांनी सूत्रसंचालन केले. संचालिका माया अभ्यंकर यांनी आभार मानले. हा कार्यक्रम मकरंद पत्रकार प्रतिष्ठान आणि द. न. पटवर्धन जन्मशताब्दी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोजित करण्यात आल्याने अध्यक्ष विवेक पटवर्धन यांचा सत्कार फडणीस यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमास वाईकरांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली.
प्रारंभी संस्थेच्या आर्ट गॅलरीमध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफर देवेंद्र पोरे यांच्या निसर्गातील विविध छटा पक्षी व प्राण्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन श्री.फडणीस यांच्या हस्ते करण्यात आले. २१ मे पर्यंत सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ५ ते रात्रौ ८ पर्यंत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले असून त्याचा वाईकर रसिकांनी लाभ यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




