नांदलापूर येथील सुखशांती वाचनालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
"मराठी भाषेला समृद्ध परंपरा लाभली आहे. आजच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती ही केवळ गरज नसून तो आपला मूलभूत अधिकार आहे, असे मानले पाहिजे. मराठी भाषा ही आपली खरी ओळख असून तिच्या जतनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे काळाची गरज आहे," असे प्रतिपादन सुखशांती सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विश्वासराव शिर्के यांनी केले.
नांदलापूर (ता. कराड) येथील सुखशांती सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन व ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन विश्वासराव शिर्के व प्रमुख पाहुणे संजय लावंड यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या भाषणात शिर्के पुढे म्हणाले की, वाचनालये ही समाजाची बौद्धिक शक्ती वाढवणारी महत्त्वाची केंद्रे आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आदर्श वाचक बनले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने मराठी भाषेचा गौरव होईल.
प्रमुख पाहुणे संजय लावंड यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचा गौरव केला. ते म्हणाले, "कुसुमाग्रजांच्या कवितांमध्ये मानवता, स्वातंत्र्य आणि सामाजिक जाणीव ओतप्रोत भरलेली आहे. युवकांनी जास्तीत जास्त मराठी साहित्याचे वाचन करून आपल्या भाषेचा अभिमान बाळगावा."
याप्रसंगी अनिल शिर्के, अनन्या दोडमणी, राजाराम पाटील, प्रकाश शिर्के, मेजर सुनील सावंत यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास आनंदराव शिंदे, मनोज थोरात, बाळासाहेब शिंदे, महादेव लावंड, बलराम भाऊ, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ व वाचक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन ग्रंथालयाचे मार्गदर्शक शेखर शिर्के यांनी केले, तर आभार सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक विश्वासराव निकम यांनी मानले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




