सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई नगरपरिषदेच्या निवडणुकीचा धुराळा आता शांत झाला असून, नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. मात्र, सोहळ्याचा जल्लोष संपताच वाईकरांचे लक्ष आता सत्ता स्थापना आणि खातेवाटपाकडे लागले आहे. त्यातही अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे 'उपनगराध्यक्ष' पद कोणाच्या पारड्यात पडणार, यावर सध्या शहरात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.
या निवडणुकीत मतदारांनी कोणालाही स्पष्ट कौल न देता सत्तेची चुरस वाढवली आहे. भाजपच्या नगराध्यक्षासह १० नगरसेवक निवडून आले आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १२ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तसेच एका अपक्ष नगरसेवकानेही विजय मिळवला आहे.
भाजपने ही निवडणूक प्रामुख्याने 'शहराचा सर्वांगीण विकास' या मुद्द्यावर लढवली, तर राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या काही वर्षांत केलेली विकासकामे आणि शहरातील मूलभूत सुविधांच्या जोरावर मतदारांना साद घातली होती.
नगराध्यक्ष पद भाजपकडे असले तरी, नगरसेवकांच्या संख्येत राष्ट्रवादीचे पारडे जड आहे. अशा परिस्थितीत सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला काय असेल? उपनगराध्यक्ष पद भाजप स्वतःकडे ठेवणार की अपक्षाला देऊन सत्ता समीकरण जुळवणार? याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. शहरातील बाजारपेठ असो किंवा नाक्यावरील कट्टा, प्रत्येक ठिकाणी 'नवा उपनगराध्यक्ष कोण?' हाच प्रश्न चर्चिला जात आहे.
निवडणूक संपली, पदग्रहण झाले, आता खरी प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची. रखडलेली विकासकामे, पाणीपुरवठा, आणि शहरातील पायाभूत सुविधांचे प्रश्न नूतन सत्ताधारी कसे सोडवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
येत्या काही दिवसांत होणाऱ्या विशेष सभेत उपनगराध्यक्ष निवडीवर शिक्कामोर्तब होईल. तोपर्यंत वाईतील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले राहणार, हे निश्चित.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



