शिबिराच्या माध्यमातून युवकांनी दिले श्रमसंस्काराचे धडे
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर आमदाबाद येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. दि. २४ ते ३० जानेवारी दरम्यान आमदाबाद ता. शिरूर , जि. पुणे येथे यशस्वीरित्या संपन्न झालेल्या या शिबिराच्या माध्यमातून विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले गेले असल्याचे शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संदीप सांगळे व प्रा. डॉ. विवेक खाबडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या आमदाबाद येथील शिबिरामध्ये साधारण शंभर युवक युवतींनी सहभाग घेतला. शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाने आमदाबाद हे गाव राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दत्तक घेतलेले गाव आहे. प्रस्तुत शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी गावातील साधारण ११ एकर गायरान व पडीक जमिनीवर चिंचबन विकसित केले असून नव्याने तीन हजार पाचशे विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड प्रत्यक्ष श्रमदानाच्या माध्यमातून केली. याशिवाय ग्रामस्थांच्या सहभागातून स्वयंसेवकांनी या चिंचबनातील प्रत्येक वृक्षाच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ करून चिंच बनाचे सुशोभीकरण करण्याचा यशस्वी प्रयोग अमलात आणला.
याशिवाय तळेगाव ढमढेरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांशी सुसंवाद साधला. डिजिटल साक्षरतेसाठी युवक ही यावर्षीच्या शिबिराची संकल्पना होती. त्या अनुषंगाने स्वयंसेवकांनी घराघरात संगणक साक्षरता राबवण्याच्या हेतूने जनजागृती केली. ग्रामस्थांना सोशल मीडियाची आवश्यक ती माहिती देऊन संगणक साक्षरतेचे महत्व विद्यार्थ्यांनी अधोरेखित केले. याशिवाय सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक पातळीवरील ग्रामसर्वे हा उपक्रमदेखील शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे राबविला.
भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आमदाबाद गावातील पांडुरंगअण्णा थोरात माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसह संपूर्ण गावामध्ये प्रभात फेरी काढून ध्वजवंदन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या युवकांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामस्वच्छता अभियानामध्ये उस्फुर्त सहभाग घेतला. स्वयंसेवकांनी काढलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी यावेळी संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.
प्रबोधन व उद्बोधनाच्या भूमिकेतून शिबिरामध्ये अमृतवाणी हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. यामध्ये याच गावचे भूमिपुत्र असलेले ह. भ. प नवनाथ महाराज माशेरे यांची सुंदर अशी किर्तन सेवा संपूर्ण राष्ट्रीय सेवा योजनेचे युवक आणि ग्रामस्थांसाठी आयोजित करण्यात आली होती. या
प्रबोधनपर कीर्तनाच्या माध्यमातून श्री. माशेरे यांनी युवकांना श्रमसंस्कार तसेच माता-पिता व गुरुजनांचे अस्तित्व कसे जपावे याविषयीचे मौलिक मार्गदर्शन केले. याशिवाय शिबिरामध्ये प्रा. संभाजी महाराज दरोडे , प्राचार्य डॉ. राहुल जगदाळे, डॉ. बाळकृष्ण लळीत, श्री. रामदास थोरात आदींनी विविध विषयांवर शिबीरातील स्वयंसेवकांना प्रेरणादायी अशा स्वरूपाचे मार्गदर्शन केले.
शिबिरा दरम्यान ग्रामस्वच्छता अभियानासह पर्यावरण जनजागृती, नव मतदार जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, शिवार फेरी इत्यादी उपक्रम यशस्वीपणे राबविले गेले.
शिबिराचा समारोप आज शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी आमदाबादच्या सरपंच सौ. अनिता पोपट घुले, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकांतभाऊ सातपुते, संचालक परेश सातपुते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे, माजी सरपंच प्रकाशराव थोरात, शिरूर तालुका काँग्रेस किसान काँग्रेसचे अध्यक्ष रामदास थोरात, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. सुजित शेलार, युवा उद्योजक व आमदाबाद ग्रामपंचायतचे सदस्य राजेंद्र शिंदे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अविनाश सोनार, ग्रामपंचायत सदस्या सौ . स्नेहल थोरात, प्राचार्या सौ. स्वाती प्रकाश थोरात, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आशाताई खोमणे, उपशिक्षिका संजना थोरात, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नितीन पवार, युवा उद्योजक रोहित थोरात आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
राष्ट्र उभारणीसाठी युवक ही संकल्पना खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमुळेच प्रत्यक्षात अमलात येत असल्याचे प्रतिपादन महेशबापू ढमढेरे यांनी याप्रसंगी केले. समाजातील विविध घटकांमध्ये सध्या अस्वस्थता दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये एकसंघ समाज आणि सुदृढ भारताच्या निर्मितीसाठी युवा पिढीकडून खूप मोठ्या अपेक्षा असल्याचेही महेशबापू म्हणाले.
श्रीकांतभाऊ सातपुते यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. महात्मा गांधी यांचा खेड्याकडे चला हा मंत्र प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे युवक निश्चित प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी युवकांना सामाजिक बांधिलकी जोपासून जीवनात यशस्वी होण्यासाठीचा कानमंत्र याप्रसंगी दिला.
शिबिरार्थींच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात खुशी भोसे आणि कृष्णा झोडगे यांनी मनोगते व्यक्त केली. याशिवाय शिबिरातील आदर्श विद्यार्थी म्हणून किरण बोंद्रे व सिंधू महाजन यांची निवड करण्यात आली. ग्रामस्थ व महाविद्यालयाच्या वतीने या दोन्ही विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात राबवल्या गेलेल्या विविध उपक्रमांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. डॉ. दत्तात्रय कारंडे यांनी सूत्रसंचालन तर कार्यक्रम अधिकारी डॉ. विवेक खाबडे यांनी आभार प्रदर्शन केले.
शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील बहुतांश शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा