मंडळ अधिकाऱ्यास मारहाण केल्याचा होता आरोप
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली शहरातील गारमाळ भागात मंडल अधिकाऱ्यास मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून एकाची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केल्याचा निकाल जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.जी. कांबळे यांनी बुधवारी दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हिंगोली शहरातील स्वस्त धान्य दुकानदाराचा वाद सुरू होता. या प्रकरणामध्ये चौकशी करण्याच्या सूचना मंडळ अधिकारी शेख अल्लाबक्ष यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शेख अल्लाबक्ष यांनी 3 नोव्हेंबर रोजी गारमाळ येथे जाऊन चौकशी सुरू केली होती. यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गावकरी एकत्र आले.
यावेळी हमीद प्यारवाले यांनी मंडळ अधिकारी शेख अल्लाबक्ष यांच्याशी वाद घातला आणि शाब्दिक चकमकीनंतर त्याने शेख अल्लाबक्ष यांना चापट मारल्याचा त्याच्यावर आरोप करत या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. हिंगोली शहर पोलिसांनी अधिक तपास करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात एकूण सात जणांची साक्ष तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हमीद प्यारवाले यांची सबळ पुराव्या अभावी सुटका केली. हमीद प्यारवाले यांच्या वतीने ॲडव्होकेट मनीष साखळे यांनी काम पाहिले त्यांना ॲड. चेतन अग्रवाल, व ॲड. अविनाश बांगर यांनी सहकार्य केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा