मंदिराचे पावित्र्य धोक्यात - प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
![]() |
पंढरपूरचे प्रसिद्ध विष्णुपद मंदिर |
पंढरपूर - सर्व संतांचे माहेर आणि महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी म्हणून पंढरपूर प्रसिद्ध आहे. विठ्ठल रुक्मिणी अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य, असून दरवर्षी लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला भेट देत असतात. पंढरपूरला वर्षातून चार मोठ्या यात्रा असतात. त्यावेळी दर्शनासाठी येणारे भाविक पंढरपूर परिसरातील काही ठिकाणी आवर्जून भेट देतात. त्यामध्ये गोपाळपूरचे गोपाळ कृष्ण मंदिर, आणि तिथूनच जवळ असलेले विष्णुपद मंदिर हे भाविकांचे आकर्षण आहे. चंद्रभागेच्या किनारी असलेल्या विष्णूपद मंदिराला आध्यात्मिक पार्श्वभूमी तर आहेच, परंतु या मंदिराचा परिसर अतिशय आहे. विस्तीर्ण नदीपात्र आणि काठावरील वनराई यामुळे हा परिसर, निसर्ग संपदा आणि जैववैविध्याने नटलेला आहे. अनेक स्थानिक पक्षी व प्रवासी पक्षी येथे आढळून येतात. त्यामुळे विष्णुपद मंदिर परिसर भाविकांबरोबरच निसर्गप्रेमींच्याही आकर्षणाचा विषय आहे. मार्गशीर्ष महिन्यात विष्णुपद मंदिर गोपाळपूर येथे स्वतः विठ्ठल भगवान वास्तव्यास येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या महिन्यात भाविक विष्णुपदाला दर्शनासाठी जातात. जेवणाचे डबे घेऊन विष्णुपदाला जायचे, दर्शन करायचे, सर्वांनी मिळून जेवण करायचे, निसर्गाचा आस्वाद घ्यायचा, अशी अनेक वर्षाची परंपरा पंढरपुरात आहे.
मात्र या आध्यात्मिक महत्त्व असलेल्या परिसराला सध्या काही विकृतांची नजर लागली आहे. या परिसरात सध्या सातत्याने ओल्या पार्ट्या होत असल्याचे निदर्शनास येत आहे. रात्री बरोबरच कधीकधी दिवसाढवळ्या सुद्धा येथे तळीरामांचा वावर असतो. या प्रकारामुळे येथे दारूच्या रिकाम्या बाटल्यांचे खच पडलेले पाहायला मिळतात. दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, थोटके, याबरोबरच पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, चाखण्याची पाकिटे, रॅपर्स यांनी हा परिसर गलिच्छ होत आहे. आधीच अनियंत्रित वाळू उपशामुळे चंद्रभागा विद्रुप झाली आहे, त्यातून आता विष्णुपद मंदिर परिसरात तळीरामांचा उपद्रव होत असल्याने, मंदिर परिसरातील निसर्गसंपदा तर धोक्यात आली आहेच, परंतु मंदिराचे पावित्र्य सुद्धा अडचणीत आले आहे. गेल्या काही वर्षापासून पंढरपुरातील निसर्गप्रेमी तरुण 'निसर्ग संवर्धन' संस्थेच्या माध्यमातून, श्रीकांत बडवे आणि त्यांचे सहकारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये या परिसरात स्वच्छता मोहीम राबवत आहेत. मात्र परिसर गलिच्छ करणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि स्वच्छता करणाऱ्यांची कमी, त्यामुळे या परिसरात चालू असलेले अवैध प्रकार वेळीच रोखले पाहिजेत, अन्यथा भविष्यात हा परिसर अनुचित प्रकारांचा अड्डा बनू शकतो. संबंधित विभागाने यामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मंदिर समिती, नगरपालिका, वन विभाग, महसूल विभाग, बांधकाम विभाग, आणि प्राधिकरण, या सर्व विभागांनी एकत्रित उपयोजना करायला हवी. इथे वॉचमनची व्यवस्था करून, कंपाउंड करून ही निसर्ग संपदा, आणि स्थळाचे पावित्र्य टिकवले पाहिजे, असा सूर भक्तमंडळी, सर्वसामान्य नागरिक, त्याबरोबरच निसर्गप्रेमी मधून सुद्धा उमटत आहे.
सचिन कुलकर्णी
संपादक, शिवशाही न्यूज
पंढरपूरचे ज्येष्ठ निसर्गप्रेमी पक्षीमित्र बंडूकाका सबनीस यांच्याशी याबाबत शिवशाही न्यूजच्या माध्यमातून आम्ही संवाद साधला असता, त्यांनी सुद्धा या मुद्द्यावर संबंधितांनी लक्ष घालावे अशी भावना बोलून दाखवली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा