इमारतीच्या भिंतीचे आणि पत्र्याच्या शेडचे मोठे नुकसान
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई-मेणवली रस्त्यावर गोसावी वस्ती परिसरात काल रात्रीच्या सुमारास एक मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनाने रस्त्यालगत असलेल्या अंगणवाडी इमारतीला जोरदार धडक दिली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअपचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातामध्ये पिकअप गाडीचा समोरील भाग तसेच इमारतीच्या भिंतीचे आणि पत्र्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले आहे. गाडीचा वेग जास्त असल्याने ती थेट इमारतीच्या भिंतीवर आदळली. सुदैवाने, ही घटना रात्री उशिरा घडल्याने आणि अंगणवाडीच्या वेळेत नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनाचा चालक नेहर वस्ती, मेणवली येथील असून त्याचे नाव सोन्या येवले असे सांगण्यात येत आहे. चालक दारूच्या नशेत असल्याने तो गाडी वेडीवाकडी चालवत होता. गंगापूरी, वाई येथेही या चालकाने एका दुचाकीस्वाराला ठोकर मारून तो पुढे मेणवलीच्या दिशेने निघून गेला. गोसावी वस्ती येथील अपघातानंतर लगेचच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चालकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














