भैरवनाथ यात्रा शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावी हा उद्देश
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शूभम कोदे )
वाई तालुक्यातील किकली येथे होणाऱ्या भैरवनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी किकली परिसरातील दहा जणांना गावाच्या हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
वाईचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सोनाली मेटकरी यांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ (२) अन्वये हा आदेश देण्यात आला आहे. भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार संबंधित व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या आदेशानुसार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संबंधित दहा व्यक्तींना किकली गावाच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
या आदेशात साईल आदेश बाबर, यश आदेश बाबर, आदित्य जितेंद्र बाबर, तुषार भुजंग बाबर, संकेत राजेंद्र बाबर, निखिल भरत बाबर, विजय कृष्णराव बाबर, गणेश अरुण बाबर, कुलदीप दिलीप बाबर आणि अक्षय विजय बाबर यांचा समावेश आहे.
भैरवनाथ यात्रा शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावी, तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखली जावी, हा या प्रतिबंधात्मक कारवाईमागील उद्देश असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











