गणपती घाट, पसरणी घाट, परखंदी रोडसह स्मशानभूमी परिसरात छापे, नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई शहरातील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या आणि नागरिकांना त्रास देणाऱ्यांविरुद्ध वाई पोलिसांनी धडक मोहीम राबवली. या कारवाईत पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेतले असून, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली.
वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. वाई शहरातील गणपती घाट, पसरणी घाट, परखंदी रोड तसेच विविध ठिकाणच्या स्मशानभूमी परिसरात पोलिसांच्या विशेष पथकांनी छापे टाकले.
या कारवाईदरम्यान सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तसेच शिवीगाळ करून गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना वाई पोलीस ठाण्यात आणून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या अन्वये गुन्हा एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाई शहरातील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणे, धूम्रपान करणे तसेच मद्यपान करून वाहन चालविणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. अशा प्रकारचे कृत्य करताना आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रदीप सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड तसेच पोलीस कर्मचारी विक्रम धोत्रे, धीरज भोसले, हेमंत शिंदे, सोमनाथ टिके, रुपेश जाधव, गोरख दाभाडे आणि महिला पोलीस कर्मचारी पूजा गोळे यांनी सहभाग घेतला.
सार्वजनिक ठिकाणी शांतता राखण्यासाठी पोलिसांची ही मोहीम महत्त्वाची मानली जात असून, अशा प्रकारच्या गैरवर्तनाविरुद्ध कारवाई सुरू ठेवण्याचा पोलिसांचा इशारा आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











